नाशिक | प्रतिनिधी Nashik
वाहतूक ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे नाशिक तालुक्यातील ३७५ रेशन दुकानांमध्ये डिसेंबर महिन्याचा पंधरवडा संपुनही धान्य पोहचलेले नाही. त्यामुळे दुकानात येणाºया लाभार्थींना धान्य वाटप कसे करायचे या विवंचनेत रेशन दुकानदार सापडले आहेत. रेशन दुकांनांपर्यन्त धान्य पोहच करण्याचा ठेका मे.क्रिएटीव्ह कन्झुमर्स को.आॅप.सोसायटी मुंबई या शासकीय वाहतुक कंत्राटदाराने घेतला आहे.विशेष म्हणजे या कंत्राटदाराने ८ ते १० डिसेंबर या दोन दिवसात धान्याच्या गाड्या भरुन वितरणासाठी गोदामातुन बाहेर नेल्या आहेत.पण हे धान्य पेठ, व मनमाड वगळून इतर रास्त भाव दुकानदार यांचे दुकानात पाहोच झालेले नाही. त्यामुळे हे धान्य कुठे गेले व ते कधी पोहच होणार याबाबत जिल्हा पुरवठा विभागाने ठेकेदाराला चौथी नोटीस बजावत विचारणा केली आहे. तसेच वाहतुक कंत्राट रद्द् करण्याचाही इशारा दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पुरवठा विभागातील गोंधळामुळे धान्य वितरणात विविध विघ्न येत आहे. चालु महिन्यात वाहतूक ठेकेदारामुळे रेशन दुकानांमध्ये धान्य पोहच झालेले नाही. नाशिक तालुक्यात एकुण ६०३ रेशन दुकाने आहेत. त्यामधील नाशिक शहरातील २२८ दुकानांमध्ये धान्य वेळेवर उपलब्ध झाले. परंतु, नाशिक शहरालगतच्या ६८ गावांमधील ३७५ रेशन दुकानदारांना आजही धान्याची प्रतिक्षा कायम आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून एरव्ही महिन्याच्या एक ते १० तारखेदरम्यान, चलन भरुन दुकानदारांना धान्य उपलब्ध होते. तर पुढील दहा दिवसांमध्ये लाभार्थींना या धान्याचे वितरण केले जाते. परंतु, अर्धा अधिक डिसेंबर महिना संपुष्टात आला असताना नाशिक तालुक्यातील ३७५ दुकानांमध्ये धान्य पोहचलेले नाही. अशीच काहीशी परिस्थिती अन्यही तालुक्यांची आहे. अन्य चौदाही तालुक्यातील काही निमशहरी भागातील दुकानांमध्ये धान्य उपलब्ध झालेले नाही. परिणामी हे धान्य उपलब्ध कधी होणार आणि ते लाभार्थींना कधी वितरीत करायचे या चिंतेने सध्या रेशन दुकानदार हैराण झाले आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने यापूर्वी काढलेल्या शासन निर्णय, परिपत्रक व आदेशांनुसार डिसेंबर २०२५ मधील धान्याची थेट वाहतूक वेळेत सुरू करणे बंधनकारक होते. मात्र, शासनाच्या १८ मे २०१८ रोजीच्या परिपत्रकानुसार ठरविलेल्या पुरवठा साखळी व्यवस्थापन यंत्रणेची अंमलबजावणी न केल्यामुळे अनेक ठिकाणी धान्य वितरण ठप्प झाले आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील गरीब व गरजू लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत
असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ,सिन्नर, देवळा, सुरगाणा, निफाड, येवला, नांदगाव, मनमाड, बागलाण, चांदवड, नाशिक ग्रामीण आदी तालुक्यांतील अनेक रास्त भाव दुकानांमध्ये पहिल्या टप्प्यातील धान्य वाहतूक ८ ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीत होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक दुकानांमध्ये धान्य पोहोचले नसल्याचे तपासणीत निदर्शनास आले आहे. दरम्यान, धान्य वेळेत न पोहोचल्याबाबत रास्तभाव दुकानदारांनी तक्रारी दाखल केल्या असून, लाभार्थ्यांना धान्य वाटप करता न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. प्रशासनाच्या मते, ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराला आम्ही चौथ्यांदा नोटीस बाजवली होती. या नोटीस नंतर ठेकेदाराने बहुतांश तालुक्यांमध्ये धान्याचे वितरण केले आहे. काही ठिकाणी धान्य पोहचले नसेल तर तेथे ते पोहच होइल. काही ठकाणी हमालांचा विषय होता. त्यामुळे धान्य पोहचण्यात अडचणी आल्या होत्या.तसेच मे.क्रिएटीव्ह कन्झुमर्स को.आॅप.सोसायटीच्या शासकीय वाहतुक कंत्राटदाराच्या मंत्रालयातुन सुरु असलेल्या चौकशी बाबत स्थानिक स्तरावर
फारशी माहिती नाही.
सीमा अहिरे,प्र.जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक





