नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून फरार आहे. असे असताना तो नाशिकमध्ये (Nashik) असल्याचा दावा काही उत्साही नागरिकांनी बुधवारी (दि. १२) पुन्हा केला. त्याबाबतचे सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आणले. मात्र, शहर पोलिसांनी कसून शोध घेतला असता, तपासाअंती फूटेजमधील व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे दीड महिन्यांपूर्वी देखील आंधळे हा उपनगर परिसरात असल्याचा दावा एका माजी नगरसेवकाने केला होता. हा दावा फोल ठरला होता. त्यानंतर, दुसऱ्यांदा हा दावा वकिलाकरवी करण्यात आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. त्यानुसार आंधळेचा शोध घेतला असता, त्यात काहीच निष्पन्न झाले नाही.
गंगापूररोड परिसरातील (Gangapur Road Area) दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळे याला प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा काही नागरिकांनी केला. प्रकरणाची माहिती समजताच वरिष्ठांसह गंगापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजवरून तपास सुरू केला. त्यातच वकील गितेश बनकर व इतर स्थानिकांच्या दाव्यानुसार, सकाळी साडेनऊ वाजता ते सहदेवनगरातील मंदिरालगत असताना संशयित कृष्णा आंधळे व साथीदार उभा होता. दोघांना हटकल्यानंतर त्यांनी ताबडतोब बाईकवरून मखमलाबाद गावाच्या दिशेने पळ काढला. कृष्णासोबत असलेला साथीदार हा स्थानिक असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शीनी वर्तवली.
दरम्यान, देशमुख हत्या प्रकरणात याआधीच नाशिक कनेक्शन समोर आले होते. त्यामुळे वाल्मिक कराडशी संबंधित कोणीतरी कृष्णाला मदत करीत असल्याचा संशय आहे. स्थानिकांनी कृष्णाची ओळख पटवल्यानंतर ज्या प्रमाणे बाईक पळवली. त्यानुसार हा त्याला स्थानिक रस्त्यांची (Road) अधिक माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृष्णासोबत आता त्याच्या साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे (Murder) फोटो नुकतेच समोर आले होते. कृष्णा हा हत्याकांडातील नववा संशयित आहे. देशमुख यांना मारहाण केल्यानंतर कृष्णाने संशयितांच्या ‘मोकारपंती’ ग्रुपवर व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल केल्याचे समोर आले होते. मागील दीड महिन्यांपूर्वी आंधळे हा उपनगर व नाशिकरोड परिसरात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, तपासाअंती ही अफवा असल्याचे समोर आले होते. त्यानंतर, आता पुन्हा आंधळेने गंगापूर रोडवरुन रपेट केल्याचा दावा काही स्थानिकांनी केल्याने पोलिसांनी शोध सुरु केला आहे. प्रथमदर्शनी दुचाकीवरुन जाणारा व्यक्ती आंधळे नसल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले आहे.