संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यात सुरूवातीला पाऊस झाल्यानंतर पुन्हा शेवटी दिवाळीच्या दरम्यान पाऊसच न झाल्याने तालुक्यात लवकरच पाणीटंचाई भासणार आहे. आत्ताच अनेक तलावांनी तळ गाठण्यास सुरूवात केली आहे. कारण पाऊस कमी झाल्याचा हा सर्व परिणाम दिसून येत आहे. संगमनेर तालुक्यात सुरूवातीला बर्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे धरणे, छोटे- मोठे पाझर तलाव, सिमेंट बंधारे, ओढे-नाले वाहू लागले होते. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. खरीप पिकही अतीशय चांगली आली होती. पण शेवटच्या टप्प्यातही पुन्हा पाऊस होईल असे सर्वानांच वाटत होते. मात्र पाऊस झालाच नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच तलावांनी तळ गाठण्यास सुरूवात केली आहे.
परिणामी लवकरच तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याचबरोबर अनेक गावांच्या परिसरात छोटे- मोठे तलाव आहेत की, त्यांच्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असते. त्यामुळे याही तलावांची कामे होणे खर्या अर्थाने गरजेचे आहे. त्यामुळे तलावांमध्ये पाणी तरी टिकून राहील. दरवर्षी पठारभागावर मोठ्याप्रमाणात पाऊस पडत असतो. त्यामुळे पठारभाग हिरवाईने नटलेला पाहवयास मिळत असतो. सर्वत्र पाणीच पाणी असते. मात्र हेच पावसाचे पाणी वाहून जात असते. त्यामुळे वर्षांनुवर्षांपासून पठारभागाला उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
मागील वर्षी देखील भीषण पाणीटंचाई जाणवत होती. त्यातच आता याही वेळेस कमी झालेल्या पावसामुळे पाणीटंचाईचा प्रश्न गावांना भेडसावणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान वर्षांनुवर्षांपासून पठारभागाला उन्हाळ्यात टँकरचे पाणी प्यावे लागत आहे. तर रोजंदारीसाठी पुणे जिल्ह्यात जावे लागत असल्याचे नागरिक सांगत आहे.
गावांमधील पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून तालुक्यातील अनेक गावांमध्ये काही महिन्यांपासून जलजीवन मिशन योजनेंची कामे सुरू आहे. पण ती अतिशय धिम्म्या गतीने सुरू आहेत. मध्यंतरी या कामासंदर्भात तक्रारी देखील झाल्या होत्या. जर वेळेत कामे पूर्ण झाली तरच काही गावांना टँकर लागणार नाही. अन्यथा, पुन्हा टँकर शिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे गावोगावी सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेंची कामे तरी कधी पूर्ण होणार आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.