Saturday, July 13, 2024
Homeमुख्य बातम्याSave Soil : वृक्षारोपणासाठी शिवार वाचन हवे!

Save Soil : वृक्षारोपणासाठी शिवार वाचन हवे!

शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण संस्था, नाशिक.

- Advertisement -

सगळेच वृक्षारोपण मोहिमेत (Plantation campaign)सहभागी होत असतात. उत्साहाने झाडेही लावतात. पण त्यासाठी वृक्षारोपणाची व्याख्या समजवून घेणे गरजेचे आहे. आपण केलेल्या वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन कसे करणार (How to protect and nurture trees)आहोत याचा वृक्ष लावतानाच विचार केलेला हवा.

आता वेळ आली आहे वृक्षारोपण म्हणजे काय हे नीट समजून घेण्याची. वृक्षारोपण पावसाळ्यातच झाले पाहिजे असा नियम नाही. वर्षभरात तुम्ही कुठल्याही दिवशी झाडे लावू शकता. फक्त त्यांची सांभाळायची जबाबदारी घेणे गरजेचे. मित्रांनो, वृक्षलागवडीचा उद्देश हा पर्यावरण संवर्धनाकरता योग्यच आहे, मात्र ते करताना अजाणतेपणे खूप मोठ्या चुका करत आलो आहोत. तरीही त्यामुळे आपल्या उद्देशाला हरताळ फासला जाऊ शकतो, म्हणून आपण वेळीच जागरुक होणे गरजेचे आहे.

अगोदर आपण वृक्षारोपण करताना पटकन वाढणारी रेन-ट्री, गुलमोहर, पेल्ट्राफॉर्म, अकेशिया, स्पॅतोडिया, गिरीपुष्प, निलगिरी, सुबाभूळ यांसारख्या विदेशी प्रजातींची झाडे लावून ती वाढवून केवळ डोळ्यांना हरित दिसेल याची तजवीज करून ठेवलेली आहे. या विदेशी झाडांमुळे आपल्या जैवविविधतेचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता आपल्या लक्षात आले आहे की, देशी झाडे लावली पाहिजे आणि आता जो तो उठतो तो नर्सरीमध्ये जाऊन वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब या प्रजातींची मागणी करताना दिसतो. आपण जेव्हा जैवविविधतेचा विचार करतो तेव्हा नुसते वड, पिंपळ, उंबर लावून चालणार नाही तर याव्यतिरिक्तही देशी प्रजाती अस्तित्वात आहेत.

गरज आहे आपला वृक्ष अभ्यास वाढवण्याची व समजवून घेण्याची. वृक्षारोपणासाठी ज्या जागेची निवड केली त्या परिसराचे आपण थोडक्यात वृक्षारोपणाच्या दृष्टीने वाचन करणे गरजेचे आहे. त्याला आपण शिवार वाचन असे म्हणूया. अशा ठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार योग्य अशी प्रदेशनिष्ठ झाडांची निवड करणे अपेक्षित आहे. कोणाला रस्त्यालगत, इमारतीच्या आवारात, कोणाला उद्यानासाठी सोडलेल्या जागेत, कोणाला डोंगरावर झाडे लावायची असतात तर कोणाला गावाजवळ उपलब्धतेनुसार एक-दोन एकरात वृक्षारोपण करायचे असते. त्यामुळे सहज उपलब्ध असलेल्या त्याच त्याच प्रजातींची रोपे आणून लागवड करण्यामध्ये समाधान मानले जाते. वृक्षारोपण हा सोपस्कार नाहीये तर ती जबाबदारीने पार पाडण्याची प्रक्रिया आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे.

योग्य ठिकाणी, योग्य वृक्ष प्रजातीची लागवड ही काळाची गरज आहे. पर्यावरणपूरक वृक्षलागवडीच्या मागील 24 वर्षांच्या अनुभवातून मी एक सांगू शकतो, आपल्या अवतीभोवती पूर्वी पर्यावरणपूरक देशी झाडे होती त्यापैकी काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्या प्रजाती आपल्या परिसरातील निसर्गामधील साखळी राखण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

अशा वृक्षांची रोपे मिळवून किंवा तयार करून आपल्या परिसरात लावण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण हेच खरे वृक्षारोपणाचे अभ्यासपूर्ण तत्त्व आहे. तर ती एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. जैवविविधापूर्ण वातावरण निर्मितीसाठी. जबाबदारीने वृक्षारोपणानंतर त्याच्या वाढीसाठी संयमाने स्वीकारण्याचे व्रत आहे. चला तर मग वृक्षारोपण करताना विविध प्रदेशनिष्ठ व देशी झाडांची निवड करूया आणि खर्‍या अर्थाने पर्यावरण अन् जैवविविधतेची साखळी टिकवून ठेवण्यास हातभार लावूया.

- Advertisment -

ताज्या बातम्या