संगमनेर |वार्ताहर| Sangamner
राज्यात तिसरी ते नववीच्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी दहा ते बारा जुलै या कालावधीत पायाभूत चाचणी घेण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने देण्यात आले आहेत. स्टार प्रकल्पांतर्गत राज्यात नियतकालिक चाचण्या घेण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन एक व दोन अशा चाचण्या प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. दहा ते बारा जुलै रोजी होणार्या पायाभूत चाचणीत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयांचा समावेश आहे. ही चाचणी शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत.
प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केले आहे किंवा कसे याची पडताळणी करण्यासाठी व अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने पायाभूत चाचणीचे नियोजन करण्यात आले आहे. या चाचण्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेप्रमाणे असणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताण देण्यात येऊ नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त झाली आहे हे जाणून घेणे आहे. यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाचे आयोजन करणे हा उद्देश असणार आहे.
ऑक्टोबर 2024 चा शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत संकलित मूल्यमापन चाचणी एक तर एप्रिल 2025 चा पहिला आठवडा अथवा दुसरा आठवडा या कालावधीत संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन घेण्यात येणार आहे.
सदरची चाचणी ही एकूण दहा माध्यमांमध्ये घेण्यात येईल. या चाचणीसाठी विद्यार्थी सध्या ज्या वर्गात शिकत आहेत त्या इयतेच्या अगोदरच्या इयत्तेचा अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती व मूलभूत क्षमता यांचा विचार करण्यात आलेला आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षणच्यावतीने प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर पुरविण्यात येणार्या प्रश्नपत्रिका या कोणत्याही परिस्थितीमध्ये झेरॉक्ससाठी अथवा इतर साहित्यही बाहेर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आदेश देण्यात आले आहे. शाळा प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दिवशी वेळापत्रकाप्रमाणे वापरात आणतील याबाबत काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पायाभूत चाचणीसाठी वेळापत्रक निर्धारित करून देण्यात आले आहे. 10 जुलै रोजी तिसरी ते सहावीसाठी 50 गुण, सातवी ते नववीसाठी 60 गुणांची चाचणी प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी तिसरी ते सहावीला 90 मिनिटे व सातवी ते नववीसाठी 120 मिनिटे वेळ दिला जाणार आहे.
प्रत्येक इयत्तेसाठी दहा गुणांची तोंडी परीक्षाही घेतली जाणार आहे. 10 जुलै रोजी प्रथम भाषा सर्व माध्यम, 11 जुलै रोजी गणित व 12 जुलै रोजी तृतीय भाषा असे परीक्षेचे वेळापत्रक परिषदेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहेत. मागील वर्षी पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्या होत्या. यावेळी प्रश्नपत्रिकांचा मोबाईलमधून फोटो काढणे, समाज माध्यमांमध्ये इतरांना पाठविणे असे काही प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदरच्या परीक्षेचे आयोजन करण्याबाबतची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्यावर देण्यात आली आहे. शिक्षणाधिकार्यांनी 11 जून 2024 पर्यंत पाठविलेल्या सांख्यिकी माहितीच्या आधारे प्रश्नपत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका कमी पडल्यास झेरॉक्स काढाव्या लागल्यास सदरची बिले कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाहीत असेही बजावण्यात आले आहेत.
चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील असे प्रयत्न करण्याचेही सूचित करण्यात आले आहेत. चाचणी कालावधीमध्ये शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण परिषद अधिकारी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, विशेषतज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करण्याचे सूचित करण्यात आले आहेत. तपासणी केलेल्या दहा टक्के उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व डायट प्राचार्यांनी करायचे असल्याचे आदेशात म्हटले आहे. चाचणीच्या कालावधीमध्ये शंभर टक्के शाळा भेटी होतील यासाठीही संबंधितांनी प्रयत्न करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.