नाशिक। प्रतिनिधी Nashik
स्काॅलरशिपच्या क्लासला जाण्याचे सांगून घरातून निघालेल्या तेरा वर्षीय मुलाचा रामकुंडातील प्रवाहित पाण्यात बुडून मृत्यू झाला. मित्रांच्या संगनमताने ही तिन्ही मुले गंगेवर आली असता, शनिवारी(दि. ३१) दुपारी ही घटना घडली. आराध्य माेहन कऱ्हाडकर(वय १३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. जेलरोड येथील रहिवासी व वृत्तपत्र विक्रेते माेहन कऱ्हाडकर यांचा ताे मुलहा हाेता. ताे नववीच्या वर्गात शिकत हाेता.
आराध्य हा शनिवारी सकाळी स्कॉलरशिप क्लासला जाण्यासाठी घरातून सायकल घेऊन निघाला. पुढे ताे मित्र अमोल बिन व अक्षय शिंदे यांना भेटला. तेथून पुढे तिघेही शिंदे याच्या दुचाकीवरून गोदाघाटावर पोहोचले. रामकुंडाजवळ नदीपात्रात दुपारी १ वाजेच्या सुमारास तिघांनी आंघाेळीसाठी उड्या घेतल्या. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अमोल व अक्षय हे दोघे नदीघाटावर आले. आराध्यला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खात पुढे वाहून जाऊ लागला.
यावेळी आरडाओरड झाली व काही विक्रेत्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यामुळे स्थानिक जीवरक्षकांनी नदीपात्रात उड्या घेत आराध्यला शाेधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र दुर्दैवाने तो हाती लागला नाही. घटनेची माहिती पंचवटी पोलिस, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनाला देण्यात आली. दुतोंड्या मारुती मूर्तीजवळ नदीपात्रात आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला. दिवसभर जीवरक्षक व अग्निशमन दलाचे त्याचा शोध घेतला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास खंडेराव महाराज मंदिरासमोर असलेल्या नदीपात्रात आराध्यचा मृतदेह जवानांच्या हाती लागला.