दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
आई – वडिलांना न सांभाळणार्या मुलांना ग्रामपंचायतीकडून कोणतेही दाखले अथवा योजनांचा लाभ न देण्याचा ठराव जानोरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला.
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच सुभाष नेहरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ग्रामविकास अधिकारी शैलेद्र नरवाडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. यावेळी जानोरी गावातील देशी दारु दुकान गावठाणाच्या बाहेर स्थलांतर करण्यासाठी संबंधित विभागाशी पाठपुरावा चालू असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांनी गावातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी गावांतर्गत रस्ते, वाडीवस्तीवरील पथदिप बसविणे, गावपाट दुरुस्ती करणे, गावची लोकसंख्या जास्त असल्याने पाणीपुरवठ्याच्या टाकीची साठवण क्षमता कमी पडत असल्याने विभागानुसार पाण्याच्या साठवणूकीसाठी पाण्याच्या टाक्यांमध्ये वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य उपकेंद्र 1 जवळील बंधारा दुरुस्ती करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
गावातील सर्व सरकारी गटांची मोजणी करुन सरकारी गटांतील अतिक्रमण काढण्याबाबत ठराव करण्यात आला. सुवर्ण महोत्सव स्वातंत्रदिनानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट हर हर तिरंगा हा कार्यक्रम राबविण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी शैलेंद्र नरवाडे यांनी केले. शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेत स्पर्धा घेण्यात येणार असून त्याचे बक्षीस वितरण दि. 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
यावेळी जानोरी गावात जर आई-वडिलांचा सांभाळ न करणार्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी अशा मुलांना ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतेही शासकीय दाखले न देण्याचा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ न देण्याचाही ठराव एकमताने संमत करण्यात आला. यावेळी तलाठी किरण भोये, उपसरपंच हर्षल काठे, सदस्य गणेश तिडके, विलास काठे, गणेश विधाते, संगीता सरनाईक, सारीका केंग, विश्वनाथ नेहरे तसेच सोपान काठे, योगेश तिडके, ज्ञानेश्वर विधाते, भारत काठे, दिपक काठे, काळू तुंबडे, रमेश जाधव, नाना डंबाळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासीदिन साजरा न करण्याचा निर्णय
मणिपूर येथे झालेल्या घटनेचा ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेत निषेध नोंदविण्यात आला. त्याचबरोबर त्या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी दिन न साजरा करण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये पारीत करण्यात आला. यामध्ये आदिवासी दिनानिमित्त यावर्षी कोणतेही कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर मणिपूर येथे झालेल्या घटनेची दखल केंद्र सरकारने घेवून त्यावर कठोर पाऊले उचलून दोषींवर कायदेशिर कडक कारवाई करावी, जेणेकरुन यानंतर असे प्रकारचे घृणास्पद कृत्य कोणी करणार नाही असा ठरावही जानोरी ग्रामसभेत करण्यात आला.