वहिदांजींना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आणि माझ्या डोळ्यासमोर, अक्षरश: पापणी न लवताच हमने देखी है उन आंखो की महकती खुशबू, हाथ से छुके इसे रिश्तों का इल्जाम ना दो..सिर्फ एहसास है ये…रुह से महसूस करो..प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो….या ओळी तरळल्या…
अत्यंत सुंदर शब्द आणि तितकाच सुंदर मतितार्थ..प्रेम ही किती उत्कट, सरलतरल भावना आहे हे सांगणारे हे सर्वांग सुंदर गाणे..मैलाचा दगड ठरलेले …तसेच हा चित्रपट देखील भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरावा इतपत सुंदर..पण हा चित्रपट का असा सुंदर झाला तर एकमेव कारण म्हणजे वहिदा रहमान यांचा अतिशय अतिशय म्हणजे शब्दांच्या पलीकडचा सुंदर अभिनय.
स्त्रीमध्ये प्रेम, वात्सल्य, ममता, जिव्हाळा, आपुलकी आभाळभरुन असते. निसर्गानेच तिला ते उपजत दिलेय. आपण सगळेच हे गृहित धरुन चाललो आहे. मात्र हीच स्त्री आयुष्यातील एका टप्प्यावर निर्विकार होऊ शकते. तिच्यातील प्रेमभावना कोरडीठाक पडून ती एक माणूस म्हणून, स्त्री म्हणून नील, रिकामी होऊ शकते याचा प्रत्यय देणारा हा चित्रपट केवळ आणि केवळ वहीदांजींच्या अजरामर अभिनयामुळे त्यांच्या करिअरमधील व हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरतो. ज्या काळात हा चित्रपट बनला, त्या काळात देखील असा विषय घेऊन चित्रपट बनू शकतो, याबद्दल दिग्दर्शक असित सेन यांचेही विशेष अभिनंदन करावे लागेल.
प्रेयसीने दिलेल्या दु:खामुळे नैराश्यात पोहोचलेल्या देव ( धर्मेंद्र ) वर राधा ( वहीदाजी ) नर्स म्हणून उपचार करत असते. नैराश्यात पोहोचलेल्या माणसाच्या आयुष्यातून ज्याने त्यांना अपार दु:ख दिलेले असते, त्या व्यक्तीला कायमचे घालवून टाकावे लागते. त्याच्या मनात नव्याने प्रेमाची रुजवण करावी लागते. राधा एक नर्स बनून तिच्या उपचार पद्धतीचा भाग म्हणून ते ते सगळे करते, जे एक प्रेमिका करते.मात्र हे करताना राधा देवच्या प्रेमात पडते. निखळ, निर्व्याज प्रेम देते देवला. तिच्यातील सर्व प्रेमच जणू उधळून देते देववर. पण देव फक्त उपचार समजतो राधाच्या प्रेमाला आणि आजारातून बरा झाल्यावर देव त्याच्या पहिल्या प्रेयसीबरोबर लग्न करत असल्याचे आमंंत्रण पाठवतो राधाला. राधा कोसळते. साफ कोसळते. पण तिच्या भावना ती कधीच देवजवळ व अन्य कोणाशीही कधीच बोललेली नसते. त्यामुळे हे दु:खही ती कोणाजवळ बोलत नाही. घुसमटत राहते, आतल्या आत.
दरम्यान, देव असाच कायम सुखी राहावा या प्रार्थनेसह राधा स्वत:ला पुन्हा हॉस्पिटलच्या कामात व्यस्त करुन घेते. आणि हॉस्पिटलमध्ये पुन्हा देवसारखाच नैराश्यात गेलेला पेशंट दाखल होतो. राधाने देवला दिलेल्या जीवनदानानंतर अरुण या पेशंटचाही उपचार राधानेच करावा, त्याला आधार द्यावा, त्याची देखभाल करावी, त्याच्या आयुष्यातील कटू आठवणी घालवून प्रेमाने त्याचे जीवन व्यापून टाकावे असा डॉक्टरांंचा आग्रह असतो. पण राधा स्पष्ट नकार देते. मै थक गयी हूं सर..असं ती सांगते. खरं तर देवला तिने सर्वस्व मानून प्रेम केलेले असते. असंख्य सुंदर स्वप्ने तिच्या देवच्या साथीने पाहिलेले असतात. पण त्या स्वप्नांची राखरांगोळी झालेली असते. म्हणूनच पुन्हा आपल्याला प्रेमच काय तर उपचार म्हणूनही कोणाबरोबरच प्रेमाचे नाटक, अॅक्टिंग करता येणार नाही, हे तिला माहित असते. कारण तिच्यातील सगळं सगळ प्रेम ती देवला देऊन रिती झालेली असते. पण अरुण अन्य कोणाच्याच उपचारांना दाद देत नाही. शिवाय डीन तिला एका प्रसंंगाची आठवण करुन देताना म्हणतात, औरत अपना खुद का गम भुला के बाकी संंसार के सारे गम अपना सकती है…हे वाक्य एक नर्स म्हणून राधाला कर्तव्याची आठवण करुन देतात. म्हणूनच मग राधा अरुणवर उपचार करायला तंयार होते. येथे डॉक्टरांना राधाच्या मनोवस्थेबद्दल, तिच्या भावनांबद्दल कणभरही कल्पना नसते. त्यांनी दिला गृहितच धरलेले असते. मात्र राधा तयार होते. स्वत:चं दु:ख आत खोलवर गाडून टाकून.
हे उपचार करताना तिला क्षणोक्षणी देव आठवतो. देवसोबत घालवलेल्या रम्य संध्याकाळ, देवसोबतचे तिचे मंतरलेले क्षण यांच्या आठवणी तिला तिच्या अव्यक्त प्रेमाची, त्यातून तिला मिळालेल्या आयुष्यभराच्या वेदनांची आठवण करुन देत असतात. ती जखम ठसठसत राहते. ती अरुणमध्ये देव पाहत असते. अरुणही बरा झाल्यावर आपल्याला सोडूनच तर जाणार आहे हा विचार तिला मनाने दगड बनवतो. पण खरं तर अरुण राधावर मनापासून प्रेम करु लागलेला ैअसतो. तो तिला तसं सांगतो देखील. पण राधाचा प्रेमावरचा विश्वास उडालेले असतो. किसीको चाहने से थोडी ही प्रेम होता है? या एका प्रसंगातील वाक्यातील तिची अगतिकता वहीदांजींनी जिवंत केली आहे. जेव्हा राधा अरुणला त्याच्या कथेचा शेवट सांगते, राधा कुछ नही कहेगी, राधा चुप रहेगी, राधा सब सहती रहेगी..हे सांगताना वहीदांजींनी तर कमाल अभिनय केला आहे.
दरम्यान, शेवटी अरुण बरा होतो, पण राधा देवला विसरु न शकल्याने ती स्वत:च नैराश्याची शिकार होते.आणि ती त्याच हॉस्पिटलमध्ये रुग्ण म्हणून दाखल केली जाते. डॉक्टर एक दिवस राधाची डायरी सहज वाचतात, तेव्हा त्यात ओळी असतात.. मैने अरुण का केस क्यु नही लिया ये डॉक्टर को मै बता सकती तो अच्छा होता…अब मेरी खामोशी मेरी घुटन बन गयी है….
महिलांची हीच खामोशी खूप मोठी समस्या आहे. स्त्रिया त्यांच्या भावना, इच्छांचा सतत त्यांच्या कर्तव्यांपोटी त्याग करत राहतात. असंख्य दु:खांचे कढ पचवत, मान-अपमान गिळत त्या कायमच खामोशी बाळगतात, मौनात राहतात, त्यांच्या मनात तो कोंडमारा, संघर्ष सतत सुरु असतो.मला पण प्रेम हवं आहे, माझी पण स्वप्नं आहेत, मला पण मन आहे, भावना आहेत..अशी त्यांची जद्दोजहद अविरत सुरु असते. पण त्यांना हे तर तुझं कर्तव्य आहे अशी आपली संस्कृती सांगत राहते व गप्प करत राहते. त्यांना त्यांच्या स्वप्नांपासून,त्यांच्या हक्कांपासून दूर लोटत राहते. त्यांना त्यांच्या मनासारखं, मनसोक्त जगातच येत नाही कधी.
वहिदांजींना फाळके पुरस्कार मिळाल्याच्यानिमित्ताने या चित्रपटातील आणखी एक मुद्दा मला अधोरेखित करावासा वाटतोय तो म्हणजे स्त्रियांचे मानसिक आरोग्य. एक जाहिरात सध्या टीव्हीवर पाहण्यात येतेय, तिचा हॅशटॅग आहे, खुल के बोलो…पण आजही आपण महिलांना यासंदर्भात कितपत मोकळीक दिलीय, त्यांना माणूस म्हणून कितपत समजून घेतले आहे? यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह कायम आहे.
दरम्यान, ठराविक मर्यादेनंतर, माणूस म्हणून समजून घेण्यास समाजव्यवस्थेने नाकारल्यानंतर, हेटाळणी व टोकाच्या मानसिक गुलामगिरीला झुगारल्यानंतर स्त्रीला कोणाकडूनच काही नको असते. ना प्रेम, ना सन्मान, ना स्वीकार…कारण आजवर तिला सारेच गृहित धरुन चाललेले असतात. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक नात्यात, प्रत्येक अडीअडचणीत, प्रत्येक चढउतारात, प्रत्येक स्त्रीला आपण हिला हे सगळं मान्यच असेल, केवळ तीच हे करु शकते, तिला असं करण्यात काहीच अडचण नसणार, तिचं कुटुंब, तिची मुलं, तिचा नवरा म्हणजेच तिचं अस्तित्व..तिची माणसं म्हणजेच तिचं जग, तिचे नातलग म्हणजेच तिचं सर्वस्व…या सार्याभोवतीच स्त्रीला सार्यांनी युगांपासून बांधून टाकले आहे. म्हणूनच स्त्री ही सर्वप्रथम माणूस आहे, हे आपण विसरलो आहोत. तिच्या एक स्वतंंत्र माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून असलेल्या इच्छा, अपेक्षा, स्वप्न, मते यांंचा कायमच आपल्याकडे गळा घोटला गेला आहे. एका स्त्रीला तिच्या स्वत:च्या भावना, तिच्या स्वत:च्या इच्छा, शारीरिक, मानसिक गरजा, स्वत:ची मते, स्वत:चा विचार, स्वत:ची तत्वे असू शकतात याचा आपल्या समाजव्यवस्थेलाच विसर पडला आहे. मनुस्मृती काळापासूनच हे आजतागायत चालत आले आहे.
तर, खामोशी चित्रपट हा एका स्त्रीच्या सरलतरल भावविश्वाला सुरुंग लागल्यानंतर, तिच्या प्रेमासारख्या कोमल भावनेला गृहित धरल्यानंतर तिची काय अवस्था होऊ शकते, एखादी स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषावर प्रेम करते, तेव्हा ते किती उत्कट असू शकते, हे निर्मळ प्रेम जेव्हा सहज कुस्करुन टाकले जाते तेव्हा तिच्या मनावर किती मोठा आघात होऊ शकतो, तिचं भावविश्व कसं उद्धवस्त होतं याचे नितांत सुंदर चित्रण आहे. चित्रपट इतक्या सहजसुंंदररितीनेे बनवण्यात आलाय की त्याला तोड नाही. वहीदाजी सगळा चित्रपट त्यांच्या अजरामर अभिनयाने व्यापून टाकतात. प्रत्येक सीनमध्ये वहीदाजी त्या प्रसंगाशी, राधाच्या भावनांशी अंतर्धान पावल्या आहेत असं जाणवत राहते. या सहजसुंदर अभिनयाबद्दल वहीदाजी खरं तर राष्ट्रीय पुरस्काराच्या हकदार होत्या. पण या चित्रपटासाठी त्यांना मानाचा मुजरा…
वहीदाजी आणि खामोशी निमित्त महिलांच्या मानसिक आरोग्याचा नव्याने विचार करायला हवा आहे. जीवनातील अगदी लहान सहान गोष्टींमध्ये देखील महिलांना दुय्यम वागणूक आजही दिली जाते. त्यांच्या हसण्या-बोलण्या-वागण्यापासून तर त्यांचे कपडे, शिक्षण, लग्न या सगळ्याच गोष्टींवर समाज नावाच्या राक्षसी व्यवस्थेचे नियंत्रण आजही आहे. यातूनच त्यां मानसिक आजाराच्या बळी ठरतात. डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी तर स्पष्ट म्हटले आहे, की महिलांच्या भावनांचा कोंडमारा होत राहिल्यामुळेच, त्यांना कधीच माणूस म्हणून समजून न घेतले गेल्यामुळेच अंधश्रद्धेला बळी पडणार्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक असते. जन्माला आल्यापासून विवाहापंर्यंत, मुल होण्यापासून तर मृत्यूपर्यंत स्त्री एक सामाजिक, कौटुंबिक जोखडात दावणीला बांधून ठेवण्यात आली आहे. ती हे जोखड तोडण्यात स्वत:ला असमर्थ समजते, आणि मग उरते ती तिची जीवघेणी खामोशी..
– सारिका पूरकर-गुजराथी