अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघातील 14, कर्जत-जामखेड मतदारसंघातील 17 तर पारनेर मतदारसंघातील 18 ईव्हीएम पडताळणीसाठी पराभूत उमेदवार बाळासाहेब थोरात, राम शिंदे व राणी लंके यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी आज शुक्रवार हा शेवटचा दिवस असल्याने आणखी अर्ज वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी राहुरी मतदारसंघातील पाच ईव्हीएम पडताळणीसाठी पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी तर कोपरगाव मतदारसंघातील पराभूत उमेदवार संदीप वर्पे यांनी एक मतदान केंद्रावरील पडताळणीसाठी अर्ज दाखल केला होता.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत पराभूत उमेदवारांना ईव्हीएम पडताळणीबाबत मागणी करता येते. यानुसार गुरूवारी थोरात यांनी संगमनेर मतदारसंघातील घुलेवाडी, वडगावपान, राजापूर, जवळे कडलग, धांदरफळ, साकूर, निमोण, चांडेवाडी, या मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी प्रत्येकी 40 हजार रुपये रक्कम व 18 टक्के जीएसटीसह 6 लाख 61 हजार रुपयांचे शुल्क भरले आहे. त्याच बरोबर पारनेर मतदारसंघातील दोन नंबरचे उमेदवार राणीताई लंके यांनी देखील 18 मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी त्यांनी 8 लाख 49 हजार 800 रुपयांचे शुल्क भरले आहे. यात नागरपूरवाडी, वनकुटे, पठारवाडी, सुतारवाडी, भाळवणी, वडगाव गुप्ता, निंबळक, सुपा, वाळवणे, निघोज, वाडेगव्हाण या मतदान केंद्राचा समावेश आहे.
पारनेर मतदारसंघातील पराभूत उमेदवार लंके यांनी बुथ क्रमांक 2 नागापुरवाडी, बुथ क्रमांक 28 वनकुटे, बुथ क्रमांक 30 पठारवाडी, बुथ क्रमांक 38 देहरे, बुथ क्रमांक 50 सुतारवाडी, बुथ क्रमांक 92 भाळवणी, बुथ क्रमांक 94 भाळवणी, बुथ क्रमांक 95 भाळवणी, बुथ क्रमांक 114 वडगांव गुप्ता, बुथ क्रमांक 115 निंबळक, बुथ क्रमांक 117 निंबळक, बुथ क्रमांक 265 सुपा, बुथ क्रमांक 267 सुपा, क्रमाक 268 सुपा, बुथ क्रमांक 293 वाळवणे, बुथ क्रमांक 310 निघोज, क्र 313, निघोज, व बुथ क्रमांक 359 वाडेगव्हाण या 18 बुथचा समावेश आहे. तर राम शिंदे यांनी कर्जत- जामखेड मतदारसंघातील जामखेड तालुक्यातील फक्राबाद, अरणगाव, कोल्हेगाव, साकत, राजेवाडी, पाडळी, फुंगेवाडी, खर्डा, जावखेडशहता यासह कर्जत तालुक्यातील कर्जत शहर, पिंपळवाडी, बर्गेवाडी, परिटवाडी, कापरेवाडी, कोरेगाव, कर्जत शहर याठिकाणच्या ईव्हीएम मशीनचा समावेश आहे. राहुरी मतदारसंघातील नंबर दोनचे पराभूत उमेदवार तनपुरे यांनी बुधवारी मतदारसंघातील पाच मतदार केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे. तर कोपरगाव मतदारसंघातील वर्पे यांनी देखील ईव्हीएम पडताळणीबाबत अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, निकाल लागल्यानंतर 45 दिवसानंतर शुल्कासह दाखल अर्जानूसार त्यात्या मतदारसंघात पडताळणी केली जाणार आहे.
शिंदेंच्या अर्जामुळे आर्श्चय
सध्या राज्यासह देशात इव्हीएम मशिनच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विशेष करून राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिगग्ज नेत्यांचा पराभव झाला असून त्याला इव्हीएम मशीनच जबाबदार धरण्यात येत आहे. इव्हीएम मशीनमध्ये गडबड करून भाजप आणि मित्र पक्षाने यश मिळवले असल्याचा दावा विरोधी महाविकास आघाडीतील काँग्रेस, उध्दव ठाकरे गटाच्यावतीने करण्यात येत असतांना आता भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी इव्हीएममधील मतांची पडताळणीची मागणी केलेली असल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.