Monday, November 25, 2024
Homeअग्रलेखजाणत्यांनी युवा पिढीचे सामाजिक पालकत्व स्वीकारावे

जाणत्यांनी युवा पिढीचे सामाजिक पालकत्व स्वीकारावे

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने उडालेली खळबळ अजुनही शमलेली नाही. तिने आत्महत्या का केली असावी याविषयीचे तर्कवितर्क अजुन काही काळ सुरु राहातील. झगमगाटी जीवन जगत असताना होणारी ही पहिलीच आत्महत्या नाही. वैशाली ठक्कर, कुशल पंजाबी, सेजल शर्मा, प्रत्युषा बॅनर्जी  अशी यादी लांबतच जाणारी आहे. आयुष्यात काय हवे आहे असा प्रश्न एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला विचारला तर, पैसा, स्थैर्य, समाजात स्थान आणि त्याबरोबर मिळालीच तर प्रसिद्ध हवी असे उत्तर मिळेल. पण उपरोक्त व्यक्तींकडे ते सगळे असुनही त्यांनी आत्महत्या केली. असे का? आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले जाते? समाजमाध्यमांच्या उदयानंतर माणसांचे जगणे दोन जगात विभागले गेले. आभासी आणि वास्तविक. पैसा, स्थैर्य आणि प्रसिद्धी सर्वांनाच हवी असते. तथापि मेहनतीने व टप्प्याटप्प्याने वरची पायरी चढावी लागते हेच माणसे विसरुन जातात. मग स्वप्रतिमेची भूक भागविण्याचा प्रयत्न माणसे समाजमाध्यमांवरील आभासी जगात करतात. त्यांना जशी हवी तशी स्व प्रतिमा समाजमाध्यमांमध्ये उभी करतात. जी कदाचित त्यांच्या आयुष्याहुनही मोठी (लार्जर दॅन लाईफ) असते. माणसांना, विशेषत: युवा वर्गाला तो सर्वात सोपा मार्ग वाटतो. एखादी व्यक्ती घाबरट असते. तथापि त्या समस्येच्या मुळाशी जाण्याऐवजी समाजमाध्यमांवर डॅशिंग प्रतिमा निर्माण करणे सोपे वाटू लागते. माणसे चारचौघात वापरु शकत नाहीत अशी भाषा समाजमाध्यमांवर वापरली की युवापिढी त्याकडे आकर्षित होते. हे लक्षात आल्यामुळेच कदाचित पण अशी भाषा वापरणारांची संख्या वाढत आहे. अशा रीतीने माणसे हळूहळू आभासी प्रतिमेतच रमतात आणि मग अडकतात देखील. कारण त्यांची आभासी प्रतिमा आणि वास्तवता यात महद्अंतर असते. त्यातील दरी सांधता सांधता माणसांची दमछाक होते. अनेकांना नैराश्य येते. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट केल्याचे ओझे पेलवता पेलवत नाही. नैराश्य आल्याचे बोलले तर आभासी प्रतिमेला तडे जाण्याची भीती अनेकांची बोलती बंद करते.  या सगळ्या गोंधळात अनेकांचे पायही जमिनीपासून सुटतात. दुदैर्वाने आभासी प्रतिमेला कोणतीही मूल्ये नसतात. त्याची जाणीव करुन देण्यात त्यांचे पालक आणि शिक्षणपद्धती कमी पडते. आभासी प्रतिमेच्या नादात वास्तवाशी फारकत होते. पूर्वी संयुक्त कुटुंबपद्धतीत ताणाचा आपोआप निचरा व्हायचा. मन मोकळे करण्यासाठी ऐकणारे कान असायचे. तथापि कुटुंबे छोटी झाली. घर चालवण्यासाठी स्त्री आणि पुरुष असे दोघांनी कमवायलाच हवे असा भ्रमही जोपासला गेला. त्यामुळे मुले घरी आणि पालक किमान बारा तास घराबाहेर असे चित्र घरोघरी निर्माण झाले. मुलांकडे वेळच वेळ आणि पालकांकडे मात्र वेळेचाच अभाव. परिणामी संवाद संपत चालला आहे. त्यामुळेच आभासी आणि वास्तव यामध्ये होणारी मानसिक कोंडी कशी फोडावी हेच माणसांना कळेनासे झाले आहे. त्यातुनच आत्महत्या घडत असाव्यात का? मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी पोषक वातावरण हवे. पालकांशी संवाद हवा आणि मुल्यांची रुजवण व्हायला हवी. यश कष्टसाध्य असते, त्याला कोणताही जवळचा मार्ग (शॉर्टकट) नसतो हे मुलांच्या मनावर बिंबवायला हवे. निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याबरोबरच त्याची जबाबदारी घ्यायला आणि अपेक्षाभंगाचे दु:ख पचवायला त्यांना शिकवले जावे. ही जबाबदारी पालकांची तर आहेच पण समाजाच्या भल्यासाठी उभरत्या पिढीचे सामाजिक पालकत्व स्वीकारायला जाणत्यांनी पुढाकार घ्यायला हवा.  

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या