नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik
नाशकातील भाजप पदाधिकारी शरद फडोळ यांना फोनवरून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप पदाधिकारी शरद फडोळ हे गुरुवारी (दि. ९) घरी असतांना रात्री सव्वा अकरा वाजेच्या दरम्यान त्यांना अनोळखी व्यक्तीने फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत गोळीबार करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फडोळ यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची भेट घेत झालेला प्रकार कथन केला.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार सोमनाथ गुंड करत आहेत. फडोळ यांना धमकी देणारा व्यक्ती कोण आहे व त्याने कुणाच्या सांगण्यावरून धमकी दिली याचा तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशकात सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारांची धरपकड मोहीम सुरु आहे. नागरिकांनी आयुक्तांच्या या निर्णयाचे स्वागत होतांना दिसून येत आहे. एकीकडे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सुरु असतांना फोनद्वारे राजकीय पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताने एक प्रकारे पोलिसांना आव्हान दिल्याचे दिसून येत आहे.




