Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबालिकेवर अत्याचार करून खून; हत्येचा खटला जलदगती न्यायालयात - मुख्यमंत्री फडणवीस यांचे...

बालिकेवर अत्याचार करून खून; हत्येचा खटला जलदगती न्यायालयात – मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

तालुक्यातील डोंगराळे येथील साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्त्या झाल्याच्या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भातील खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी शासनाने अनुकूलता दर्शवली आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी या संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

डोंगराळे येथील प्रज्ञा दुसाने या बालिकेच्या हत्त्येसंदर्भातील जनसामान्यांतील भावना तीव्र झाल्या आहेत. या घटनेचा तालुक्यासह राज्यभरातून निषेध होत आहे. जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी मोर्चे, आंदोलने करीत या घटनेतील नराधमास फाशीची सजा व्हावी या मागणीची निवेदने प्रशासनाकडे दिली जात आहेत. याच अनुषंगाने मंत्री भुसे यांनी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.

YouTube video player

डोंगराळे गावात आज तिसर्‍या दिवशीही शोकाकुल वातावरण होते. पीडितेच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी विविध नेते व सामाजिक कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. आमदार चित्रा वाघ यांनीही डोंगराळे गावी जावून दुसाने कुटूंबीयांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. राज्य शासनाने या प्रकारणाची गंभीरतेने दखल घेतली आहे. महिला अत्याचार संदर्भात राज्य शासन संवेदनशील आहे. या निर्घृण हत्त्येचा तपास विशेष पोलीस अधिकार्‍यांकडून करण्यात येईल. तपासातील कोणतेही दुवे कच्चे राहणार नाही याची दक्षता राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी घेतली आहे. तपास यंत्रणांना या संदर्भातील कसून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती वाघ यांनी दिली.

धुळे लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनीही डोंगराळे येथे भेट देवून पिडीत कुटूंबियांशी संवाद साधला. दुसाने कुटूंबाच्या भावनिक वेदना समजून घेत त्यांनी आवश्यक ती मदत आणि पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या भेटीत त्यांनी दुसाने कुटूंबाच्या सुरक्षिततेसह न्यायप्राप्ती बाबतही संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली. खासदार बच्छाव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दुरध्वनीव्दारे संवाद साधून आरोपीविरूध्द तात्काळ आणि कडक कारवाई करून जलदगतीने तपास करण्याची मागणी केली.

गेल्या रविवारी घरातून खेळण्यासाठी बाहेर पडलेली ही लहान मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. या शोधा दरम्यान ती गावालगतच्या मोबाईल टॉवरजवळील झाडाझुडपामध्ये छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून आली. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय बळावल्याने डोंगराळे गाव हादरून गेले होते. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तत्परतेने तपास करीत गावातील रविंद्र खैरनार या संशयिताला अटक केली. क्रुरतेचा कळस गाठणार्‍या या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत.

आरोपीला तात्काळ फासावर लटकविण्यात यावे या मागणीसाठी डोंगराळेकरांनी सलग दोन दिवस आंदोलन केले. तालुक्यातील अनेक शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. मंत्री दादा भुसे यांनी डोंगराळे येथे भेट दिली यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेत मंगळवारी मुंबईत डोंगराळे येथील ग्रामस्थांसह मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या प्रकरणातील तीव्र जनभावना व घटनेचे गांभीर्य लक्षात घेत हा खटला फास्ट टॅ्रक न्यायालयात चालविण्यात यावा, खटल्यासाठी सरकारी वकिल उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आमदार मंगेश चव्हाण यांनी डोंगराळे येथे जावून पिडीतेच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांची भेट घेतली होती.

प्रज्ञाचा मारेकरी शेखर उर्फ विजय संजय खैरनार याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी डोंगराळे येथे जावून त्याचे घर सील केले. खैरनार याने पीडित बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतरच तिचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट होत आहे. पोलीस यंत्रणा त्यादृष्टीने तपासातील सर्व बारकावे तपासून पाहत पुरावे गोळा करीत आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गृह विभागाने पोलीस उपअधिक्षक यशवंत बावीस्कर यांच्याकडे हा तपास सोपविला आहे.

डोंगराळे गावात अजूनही स्मशान शांतता
प्रज्ञा दुसानेच्या निर्घृण हत्त्येचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. गेल्या तीन दिवसापासून डोंगराळे येथे दुसाने कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राजकीय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांची रिघ लागली आहे. या घटनेतून डोंगराळे गाव अद्यापही सावरलेले नाही. गावात तणावपूर्ण शांतता नसली तरी सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. ग्रामस्थ अद्यापही या घटनेतून सावरलेले नाहीत.

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...