धुळे –
शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगरात चोरट्यांनी सेवानिवृत्त स्वच्छता कर्मचारी महिलेकडे धाडसी घरफोडी करून रोख रक्कमेसह 3 लाख 37 हजार 500 रूपयांचा मुद्येमाल लंपास केला आहे.
आज सकाळी चोरीची घटना लक्षात आली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
साक्री रोडवरील यशवंत नगरातील गुरूनानक मंदिराजवळ जिल्हा रूग्णालयाच्या सेवानिवृत्त स्वच्छता कर्मचारी जयश्री शंकर महाले या राहतात. त्यांच्या मोठ्या भावाचे निधन झाले म्हणुन त्या दि. 27 रोजी सायंकाळी शहरातील आकाशवाणी केंद्राजवळील ओमनगर येथे राहत असलेल्या लहान भावाकडे गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचे घर बंद होते.
ही संधी साधत दि. 27 रोजी सायंकाळी 7 ते दि. 29 रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलपू तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून रोख 70 हजार रूपये, 80 हजारांच्या 40 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, 14 हजारांची 7 ग्रॅमची अंगठी, 8 हजारांचा 4 ग्रॅमचा सोन्याचा तुकडा, 30 हजारांची 14 ग्रॅमची सोन्याची चैन, 12 हजारांची 6 ग्रॅमची सोनपोत, 28 हजारांची 14 ग्रॅमची सोन्याची चैन, 34 हजारांची 17 ग्रॅमची सोनपोत, 28 हजारांची 14 ग्रॅमची सोनपोत, 6 हजारांच्या 3 ग्रॅमच्य सोन्याच्या वाट्या, 2 हजारांचे 1 ग्रॅमचे सोन्याचे मनी, 10 हजारांचे 5 ग्रॅमचे सोन्याचे पेंंडल, 5 हजार
500 रूपयांचे 55 ग्रॅमचे चांदीच्या साखळ्या, 1500 रूपयांची15 ग्रॅमची चांदीची नथ, 5 हजारांचे 50 ग्रॅमचे चांदीचे जोडवे, 3 हजार 500 रूपयांच्या चांदीच्या 35 ग्रॅमच्या साखळ्या असा एकुण 3 लाख 37 हजार 500 रूपयांचा मुद्येमाल चोरून नेला आहे. जयश्री महाले या दि. 29 डिसेंबर रोजी सकाळी घरी आल्या असता घरफोडी झाल्याचे लक्षात दिसले. त्यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसात घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच ठसे तज्ज्ञ व श्वान पथक पाचारण करण्यात आले होते.