दिल्ली । Delhi
देशाची राजधानी दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या राजेंद्रनगरमधील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात (Delhi UPSC IAS Coaching Center Tragedy) पाणी भरल्याची घटना घडली. या भरलेल्या पाण्यात बुडून तीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या राजेंद्र नगर भागातील नाला फुटल्यानंतर जवळील असलेल्या कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरले. कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे काही विद्यार्थी अडकले. या दुर्घटनेत पाण्यात अडकलेल्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं.
हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला पाठींबा; पवारांची ‘मराठा मोर्चा’शी चर्चा
या पथकाने तातडीने विद्यार्थ्यांचा शोध सुरु केला.या घटनेत तीन विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले. नेविन डाल्विन हा केरळचा विद्यार्थी जवाहरलाल नेहरु विद्यापीठात पीएचडी करत होता आणि सोबतच सनदी अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. तान्या विजय कुमार सोनी, श्रेया राजेंद्र यादव या दोन तरुणींचा यामध्ये मृत्यू ओढावला आहे.
दरम्यान, दिल्लीतील भाजपा खासदार बांसुरी स्वराज आणि दिल्ली मनपाच्या महापौरी शेली ऑबेरॉय यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची पाहणी केली. खासदार स्वराज यांनी या घटनेसाठी आम आदमी पक्षाच्या सरकारला दोष दिला. तसेच स्थानिक आमदार दुर्गेश पाठक यांच्याकडे स्थानिकांनी नालेसफाई करण्याची विनंती केली होती. मात्र नालेसफाई न झाल्यामुळे नाल्यातील पाणी तळघरात शिरले.
हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेसाठी निधी नाही? अजित पवारांनी विरोधकांना दिलं उत्तर
या दुर्घटनेनंतर कोचिंग सेंटरचे मालक (Coaching Center Owner) आणि समन्वयक (Coordinator) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एमसीडीचे पर्यवेक्षक ऋषीपाल म्हणाले की, काम जवळपास पूर्ण झाले आहे. फक्त ३-४ इंच पाणी शिल्लक आहे. एमसीडीने सर्व मशीन्स बसवल्या आहेत. तळघरासह इमारत पूर्णपणे रिकामी आहे. याठिकाणी कोणीही फसलेले नाही. या दुर्घटनेनंतर दिल्लीच्या महापौरांनी इमारतीच्या नियमांचे उल्लंघन करून तळघरात सुरू असलेल्या कोचिंग सेंटर्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.