Tuesday, May 7, 2024
Homeअग्रलेखएका कूप्रथेला तिलांजली!

एका कूप्रथेला तिलांजली!

पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची देशव्यापी ओळख आहे. भेदाभेद नष्ट होऊन सर्व जाती-धर्मांतील नागरिकांनी एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने राहावे म्हणून अनेक महापुरुषांनी प्रयत्नांची शिकस्त केली. माणसाला माणूस म्हणून वागवले जावे यावर भर दिला. संतविचारांतून समानतेचाच पुरस्कार केला गेला आहे. संतांच्या आणि महापुरूषांच्या उज्ज्वल विचारांचा महान वारसा सांगणार्‍या महाराष्ट्रातून जातीभेदाच्या उच्चाटनासाठी सामाजिक आणि शासकीय पातळीवर बरेच प्रयत्न केले गेले आहेत. आजही केले जात आहेत. तरीसुद्धा जातीभेदाचे भूत आजदेखील डोके वर काढताना दिसते. राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार आणि हक्क दिले आहेत. तरीसुद्धा माणसा-माणसांतील भेदाभेदांच्या अदृश्य भिंती उभ्या असल्याचे वेगवेगळ्या घटनांतून अनुभवास येते. नाशिकपासून जवळच असलेल्या त्र्यंबकेश्‍वरची ग्रामदेवता महादेवीच्या गावजेवणावळीची जुनी परंपरा आजही सुरू आहे. गावातील विशिष्ट समाजासाठी वेगळी पंगत देण्याची अनिष्ट परंपराही आतापर्यंत पाळली जात होती. यंदा मात्र पंक्तीभेदाची कूप्रथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) प्रयत्नाने अखेर बंद पडली आहे. महादेवी मंदिरात दरवर्षी चैत्र अथवा वैशाखात गाववर्गणीतून गावजेवण घातले जाते. दहा हजारांवर लोक त्याचा लाभ घेतात. गावातील सर्व समाजांसाठी एकत्र पंगती बसतात. मात्र विशिष्ट समाजातील लोकांसाठी वेगळी पंगत बसवली जात असल्याचे ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना समजले. जातीभेदाला खतपाणी घालणार्‍या या पंक्तीभेदाबद्दल ‘अंनिस’चे तालुकाध्यक्ष संजय हरळे यांनी गेल्याच वर्षी आक्षेप नोंदवला होता. यावर्षीच्या गावजेवणावळीची तयारी सुरू झाल्यावर ‘अंनिस’च्या राज्यपातळीवरील प्रमुख पदाधिकार्‍यांनी त्र्यंबकेश्‍वरच्या तहसीलदारांची नुकतीच भेट घेतली. महादेवीच्या गावजेवणात जातीभेद केला जात असल्याची लेखी तक्रार करून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी केली. तहसीलदारांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर महादेव मंदिर ट्रस्टच्या सदस्यांना पत्रातून योग्य ती समज देण्यात आली. गावजेवणावळीत कोणताही पंक्तीभेद न करता विशिष्ट समाजातील लोकांसाठी वेगळी पंगत न देता सर्व समाजातील लोकांच्या पंक्तीतच त्यांनीही जेवण घ्यावे, असा निर्णय घेण्यात आला. जातीभेदाला हवा देणारी त्र्यंबकेश्‍वरमधील एक कूप्रथा ‘अंनिस’च्या जागरूकतेमुळे अखेर बंद झाली आहे. पंक्तीभेदाची ही परंपरा कशी सुरू झाली याबाबत ‘अंनिस’ने दिलेली माहिती धक्कादायक आहे. पन्नास वर्षांपूर्वी गावातील बहुजन समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामदेवता महादेवीस गाववर्गणी काढून गावजेवणाची प्रथा सुरू केली होती. गावातील अठरापगड जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन स्वयंपाक करीत व त्या भोजनाचा आनंद घेत. काही वर्षांपूर्वी महादेवी मंदिराचे ट्रस्ट झाले. नव्या पिढीतील सदस्यांनी विशिष्ट समाजासाठी वेगळ्या पंगतीच्या प्रथेला जन्म दिला. गावात एकोपा निर्माण करण्याच्या मागच्या पिढीतील ज्येष्ठांच्या उद्देशालाच त्यांनी हरताळ फासला. त्याबद्दल ‘अंनिस’च्या संजय हरळे यांनी आक्षेप नोंदवल्यामुळेच या कूप्रथेला वाचा फुटली आणि ती बंद करण्याच्या दिशेने तत्काळ पावले पडली. एका कूप्रथेला तिलांजली मिळाली हे खूप बरे झाले. संत निवृत्तीनाथांच्या वास्तव्याने पावन झालेल्या त्र्यंबकेश्‍वरात भेदाभेदाचा असा प्रकार घडावा हे आश्‍चर्यच! समाजहिताचा व समतेचा विचार रूजवण्याची अपेक्षा नव्या पिढीकडून असताना महादेवी मंदिराच्या सदस्यांनी प्रतिगामी विचारांचा पुरस्कार का करावा? माणसाला माणूस म्हणून न वागवता त्याला तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती भारतीय समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला मारक आहे. काही मंदिरांमध्ये आजही स्त्रियांना प्रवेश नाकारला जात असल्याची उदाहरणे पाहावयास मिळतात. समानतेचा हक्क मिळवण्यासाठी स्त्रियांना संघर्ष करावा लागतो. ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश जगाला देणार्‍या भारताच्या प्रतिष्ठेला अशा गोष्टी बाधा आणतात. अशा अनिष्ट रूढ-परंपरांची पाठराखण करणार्‍या प्रवृत्तींना वेळीच रोखण्याची गरज आहे. सामाजिक व शासकीय पातळीवर सामाजिक सलोखा आणि जातीविरहीत समाजरचनेसाठी प्रयत्न होत असताना राजकीय पक्ष मात्र निवडणुका जिंकण्यासाठी आजही जातीपातीच्या राजकारणावरच भर देतात. एखाद्या मतदारसंघात कोणत्या जातीचे प्राबल्य आहे ते पाहून तेथील उमेदवार ठरवला जातो. ही भूमिका जातीभेद जोपासणारी आहे. राजकीय स्वार्थासाठी सुरू असलेल्या या समाजविभाजक विचारापासून राजकीय पक्ष फारकत कधी घेणार?

- Advertisment -

ताज्या बातम्या