उद्या संक्रांत! नवीन वर्षातील हा पहिला मोठा सण. सण कोणताही असो, लोक तो उत्साहात साजरा करतात. त्याला संक्रांतही अपवाद नाही. बाजारात लागलेल्या पतंगांच्या आणि तिळगुळाच्या दुकानांनी सणाची वातावरणनिर्मिती केलीच आहे. संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे. अलीकडच्या काळात संक्रांतीचे पतंगबाजीशीही घट्ट नाते जुळले आहे. डिसेंबरपासूनच आकाशात पतंग उडायला लागतात.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून आकाशात विहरणारे पतंग आणि कल्ला करणारी मंडळी गच्च्यागच्च्यांवर दिसत आहेत. पतंगबाजीकडे खेळ म्हणुनच पाहिले जायला हवे. तरच त्यातला निर्भेळ आनंद उपभोगता येईल. तथापि पतंग काटाकाटीचा खेळ, त्यासाठी चाललेली चढाओढ, पतंग उडवण्यासाठी पत्र्यांवर चढलेली आणि कटलेल्या पतंगांच्या मागे भान विसरुन धावणारी मुले ही दृश्ये अंगावर काटा आणतात. सक्रांत मावळते आणि दुसर्या दिवशी काही ठिकाणी घडलेल्या अपघातांच्या बातम्या माध्यमात झळकतात. यंदाचे वर्ष तरी त्याला अपवाद ठरावे. पालकांनी भान ठेवले तर पतंगबाजीमुळे होणार्या अपघातांना काही प्रमाणात नक्की आळा बसू शकेल. मुले मुलेच असतात. अर्थात पतंग उडवणारी मोठी मुले आणि माणसे याला अपवाद आहेत. त्यांनीही त्यांची जबाबदारी लक्षात घ्यायला हवी.
लहान वयाची मुले त्यांच्याकडे बघुनच शिकतात हे विसरुन चालेल का? लहान वयाची मुले खेळतांना भान विसरु शकतात. पतंगबाजीचा खेळ सुरक्षित खेळला गेल्यास त्याचा आनंद सर्वांनाच उपभोगता येईल. पतंगीसाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा माणसांसह पक्षांसाठीही जीवघेणा ठरतो. नायलॉन मांजा वापरणारी मुले गच्चीवर आणि मैदानावर सापडतात. मांजा वापरणार्याला 25 टक्के दंड करा. मांजा वापरणारेच खरेदीचे दुकान दाखवतील. त्या दुकानदाराकडून 75 टक्के दंड वसूल करा असा मजकूर समाजमाध्यमांवर फिरत आहे. त्यातील मर्म पालक लक्षात घेतील का? आपली मुले नायलॉन मांजा वापरणार नाहीत यासाठी पालकांनाच लक्ष घालावे लागेल.
वीजेच्या तारांजवळ पतंग उडवू नका असे आवाहन वीज मंडळाने केले आहे. त्यातील गांभिर्य मुलांच्या लक्षात नाही आले तरी पालकांच्या लक्षात यायला हवे. पिढीगणिक मुले हुशार आणि त्याबरोबरच अचपळही होत आहेत. पतंगबाजीच्या खेळावरुन सुद्धा हे लक्षात येऊ शकेल. पालकांना कळू न देता पतंगबाजीचा खेळ खेळण्याचे अनेक मार्ग ते शोधून काढू शकतात. नव्हे काढतातच.
घराच्या आसपासचा परिसर सोडूनच पतंग उडवण्याची चलाखी करतात. आपली मुले कुठे पतंग उडवतात? त्यासाठी कोणती साधने वापरतात? कटलेली पतंग मिळवण्यासाठी वाहनांदी गजबजलेल्या रस्त्यांमधून धावाधाव करतात का? यात पालकांनी लक्ष घालायला हवे. अन्यथा मुले घराबाहेब पडली की काय करतात याकडे बहुतके पालकांचे लक्ष नसते.
मध्यंतरी अशीच एक घटना घडली. घरी न सांगता मुले परस्पर मित्राच्या लग्नाला चार चाकी वाहन घेऊन गेली. त्या वाहनाचा अपघात झाला आणि दुर्दैवाने त्यात काहींचा मृत्यूही ओढवला. अपघाताची बातमी सांगण्यासाठी पोलीस घरी गेले तेव्हाच पालकांना त्यांची मुले बाहेरगावी गेल्याचे समजले. त्यामुळे निमित्त अगदी पतंगबाजीचे असो अथवा दुसरे कुठलेही, मुले काय करतात याबाबत पालकांनी जागरुक असण्याची आवश्यकता आहे. मुले कोणताही धोका न पत्करता पतंग उडवतील आणि पतंगबाजीच्या खेळातील आनंदही उपभोगतील. हे तेव्हाच घडणे शक्य आहे, जेव्हा पालक जागरुक होतील.