Saturday, July 27, 2024
Homeअग्रलेखऐसा पुण्य महान करो...

ऐसा पुण्य महान करो…

सध्या पावसाळा सुरु आहे. सृष्टी हिरवा शालू ल्यायली आहे. सृष्टीसौन्दर्याचे वर्णन साहित्यिक, कवी अनुपम भाषेत करतात. सृष्टीसौन्दर्य अनुभवण्यासाठी पावसाळी पर्यटनाला हळूहळू बहार येतो. तथापि दृष्टीच्या अभावामुळे लाखो लोकांचे आयुष्य फक्त एकाच रंगाने व्यापले आहे. देशातील लाखो लोक नेत्रदानाच्या आशेवर दिवस व्यतीत करतात. देशात सध्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा सुरु आहे.

नेत्रदानाशी संबंधित गैरसमज दूर करून नेत्रदान करण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे हा त्यामागचा उद्देश आहे. तथापि या विषयावर अपेक्षित जागृती अद्यापही दूरच आहे, असा या विषयाशी संबंधित संस्थांचा आणि कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. देशात नेत्रदानाची गरज किती तीव्र आहे? भारतात सुमारे दीड कोटींपेक्षा जास्त लोक अंध आणि सुमारे तेरा कोटींपेक्षा जास्त लोक अंशतः अंध आहेत, असा जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष आहे. नजीकची दृष्टी कमी झाल्याची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असे ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ द ब्लाइंडनेस’ या संस्थेचे निरीक्षण आहे. त्या तुलनेत नेत्रदानाचे प्रमाण अत्यल्प म्हणावे असे आहे.

- Advertisement -

दरवर्षी साधारणतः साठ हजार नेत्रदान केले जाते. करोना काळानंतर आकडेवारीत घसरण झाल्याचे आणि नेत्रपेढ्यांची संख्याही कमी झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. उपरोक्त आकडेवारी भीतीदायक आणि अस्वस्थ करणारी आहे. भारतीय संस्कृतीत नेत्रदानाचे अपरंपार महत्व सांगितले आहे. त्याची महती वर्णन करणाऱ्या अनेक पुराणकथा घराघरात लहान मुलांना सांगितल्या जातात. नेत्रदान श्रेष्ठ दान मानले जाते. अंधत्व असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रकाश पेरण्याचे काम नेत्रदान करू शकते. त्यासाठी गरजू माणसे वर्षानुवर्षे वाट पाहतात. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वेदनेची कल्पना खचितच कोणी करू शकेल. डोळ्याला पट्टी बांधून एखादा तास घालवा, असे आवाहन एखाद्या संस्थेने केले तर किती माणसे तयार होतील? आंधळी कोशिंबीर खेळताना अनेकांना मजा येत असेल, पण लाखो व्यक्ती कायमची आंधळी कोशिंबीर कशी खेळत असतील याचा विचार लोक करू शकतील.

वास्तविक मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी इच्छुक व्यक्तीला किंवा दात्याला कुठेच न्यावे लागत नाही. फक्त जवळच्या नेत्रपेढीत नाव नोंदवावे लागते. नाव नोंदवलेले असेल तर संबंधित तज्ज्ञ त्या व्यक्तीच्या घरी येतात. या क्षेत्रात अनेक संस्था स्वयंस्फूर्त काम करतात. तथापि त्यांनाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. नेत्रदानासंबंधी गैरसमज हा मोठाच अडथळा! संपूर्ण डोळा काढला जातो, नेत्रदान केल्यावर चेहरा कुरूप होतो, नेत्रदान केल्यावर ती व्यक्ती पुढच्या जन्मात अंधच जन्माला येते, असे कितीतरी गैरसमज समाजात आढळतात. ते दूर करण्यासाठी संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते जीवाचे रान करतात. लोकांनीही त्यांना साथ देण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती नेत्रदान करू शकते हे लक्षात घेतले जाईल का? गरजू व्यक्तीची वाट खऱ्या-खुऱ्या प्रकाशाने भरून टाकण्यासारखे दुसरे पुण्य कुठले असू शकेल? मृत्यूनंतरही सुंदर सृष्टी पाहू शकण्याची संधी फक्त नेत्रदान देऊ शकते. कवी आकाश त्यांच्या एका कवितेत म्हणतात…

ज्योतिहीन नीरस जीवन को

रस दो, आँखे दान करो|

मरकर भी जो दुनिया देखे,

ऐसा पुण्य महान करो||

- Advertisment -

ताज्या बातम्या