मनमाड | प्रतिनिधी | Manmad
गेल्या एक महिन्यापासून टोमॅटोच्या भावात सुरु झालेली घसरण थांबत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बाजार समितीत टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेेटला 20 ते 30 रुपये अर्थात प्रति किलो दीड रुपये इतकाच भाव मिळत आहे. या भावाने उत्पादन खर्चच काय तोडणी व वाहतुकीचा खर्च देखील निघणार नसल्याने पानेवाडी येथील शेतकर्याने दीड एकरावरील तोडणीवर आलेले टोमॅटो शेतात सोडून दिले आहे.
बाजार समितीत दररोज टोमॅटोच्या भावात घसरण होत आहे. गत एक ते दिड महिन्यापासून सुरू झालेली ही घसरण थांबण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे पिकांवर केलेला खर्च तर सोडाच तोडणीसाठी आणि वाहतुकीवर केलेला खर्च देखील निघत नसल्याने पानेवाडी येथील साहेबराव काकड या शेतकर्याने तोडणीला आलेला दीड एकर वरील टोमॅटो पीक तसंच शेतात सोडून दिला. अशीच परिस्थिती मनमाड, नांदगावसह संपूर्ण तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकर्यांची झाली आहे. मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेवून देखील पदरी काहीच न पडल्याने शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उत्पादकांतर्फे केली जात आहे.
बोधीवृक्ष फांदी रोपण कार्यक्रमाआधी भुजबळांनी बहुजन समाजाची माफी मागावी; वंचितची मागणी
कांदा, मका पाठोपाठ टोमॅटोला नगदी पिक मानला जातो त्यामुळे मनमाडसह जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. दोन महिन्यापूर्वी टोमॅटोच्या भावात मोठी वाढ होऊन टोमॅटोला प्रति किलो तब्बल 150 ते 200 रुपये इतका प्रचंड भाव मिळाला होता या भाव वाढीमुळे काही शेतकरी थेट लखपती झाले होते पुढे भाव टिकून राहील या आशेवर पानेवाडी येथील साहेबराव काकड या शेतकर्याने दीड एकरावर टोमॅटोची लागवड केली होती परिसरातील अनेक शेतकर्यांनी देखील कांद्याला फाटा देऊन टोमॅटोची लागवड केली होती.
पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्यांनी पाणी विकत पीक जगविले शिवाय बियाणे, मशागत, खत, औषधे, तार, बांबू, सुतळी, मजुरी आदीसह इतर कामे धरून एकरी किमान 40 ते 50 हजार रुपये पेक्षा जास्त खर्च शेतकर्यांना आला आहे. मात्र अचानक टोमॅटोच्या भावात मोठी घसरण सुरु झाली असून बाजार समितीत टोमॅटोच्या 20 किलोच्या एका कॅरेटला 20 ते 30 रुपये अर्थात प्रति किलो दीड रुपये इतकाच भाव मिळत आहे.
Nashik News : पहाटेच्या सुमारास घराला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू, लाखोंचे नुकसान
कष्टाने पिकवलेल्या टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याचे पाहून शेतकरी मेटाकुटीला आला असून सध्या मिळत असलेल्या भावात पिकावर केलेला खर्च तर सोडाच तोडणी आणि वाहतुकीसाठी लागणारा खर्च देखील निघणे कठीण असल्याचे पाहून या शेतकर्याने तोडणीला आलेले टोमॅटो तसेच शेतात पडू दिले आहे.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पिके उध्वस्त झाली होती या वर्षी पावसा अभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप सोबत रब्बीचा हंगाम हातातून जाणार आहे कर्ज घेऊन टोमॅटोची लागवड केली होती अस्मानी व सुलतानी असे एका पाठोपाठ येणारे संकट शेतकर्यांचा पिच्छा सोडायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. कष्टाने पिकविलेल्या शेतमालाचे घसरत असलेले भाव शेतकर्यांना हवालदिल करणारे ठरत असल्याने टोमॅटो पिकामुळे झालेले नुकसान लक्षात घेत शासनाने पंचनामे करत नुकसान भरपाई देत दिलासा द्यावा, अशी अपेक्षा टोमॅटो उत्पादकांतर्फे व्यक्त केली जात आहे.
झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या