नाशिक रोड | प्रतिनिधी
औद्योगिक क्षेत्रात संपूर्ण भारतात व नाशिक जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या येथील इंडिया सेक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस मध्ये उद्या शनिवार दिनांक २० जुलै रोजी मजदूर संघ व वर्क्स कमिटी या दोन महत्त्वाच्या निवडणुका होणार असल्याने दोन्ही प्रेस मधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मजदूर संघाच्या एकूण २९ तर वर्क्स कमिटीच्या एकूण २४ जागांसाठी दोन्ही प्रेस मध्ये निवडणुका होणार आहे.
सुमारे अठराशे कामगार असलेल्या दोन्ही प्रेसमध्ये या दोन निवडणुका होणार असून या प्रेसमध्ये एकूण चार निवडणुका होतात त्यामध्ये प्रामुख्याने मजदूर संघ वर्क्स कमिटी वेल्फेअर फंड कमिटी व प्रेस सोसायटी अशा निवडणुका होतात. त्यामध्ये प्रामुख्याने मजदूर संघ व वर्क्स कमिटी या दोन निवडणुकींना विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दोन्ही निवडणुका उद्या शनिवार दिनांक २० जुलै रोजी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळात होणार असून त्यापैकी मजदूर संघाची मतमोजणी रविवारी सकाळी आठ वाजता सुरू होईल व सायंकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे तर वर्क्स कमिटीची मतमोजणी सोमवार दिनांक २२ जुलै रोजी होणार आहे.
गेल्या बारा वर्षापासून मजदूर संघ व वर्क्स कमिटी या दोन्ही ठिकाणी कामगार पॅनलची सत्ता आहे, पॅनलचे नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, राजेश टाकेकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली जात आहे. दरम्यान गेल्या बारा वर्षात कामगार पॅनलने कामगारांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन कामगारांना नेहमीच न्याय दिला आहे. त्याचप्रमाणे मयत कामगारांच्या वारसांना न्याय दिला आहे. कामगारांचे कुठलेही प्रश्न असो त्यासाठी कामगार पॅनल वेळोवेळी लढा देऊन व व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून कामगारांचे प्रश्न सोडविले आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीत कामगार आम्हाला नक्कीच न्याय देतील असा विश्वास पत्रकार परिषदेत पॅनलचे नेते जगदीश गोडसे व ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी व्यक्त केला.
दरम्यान दोन्ही प्रेस मध्ये पारंपारिक पद्धती नुसार कामगार पॅनल व आपला पॅनल मध्ये सरळ लढत होणार आहे दोन्ही पॅनलच्या वतीने सर्व जागा लढविण्यात येत असून आपला पॅनलचे नेतृत्व हरिभाऊ ढिकले व किरण गांगुर्डे हे करत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा