राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे 2 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान एका कपाशीच्या शेतात चाँद आबीर पठाण या 45 वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह आढळून आला. चाँद पठाण याची आत्महत्या की, घातपात यावरून परिसरात चर्चेला उधाण आले होते. मात्र, याबाबत काल उशिरा राहुरी पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी एका महिलेसह दोघांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे.
याबाबत मयत चाँद पठाण यांचा मुलगा शकील चाँद पठाण याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, वडील चाँद आंबीर पठाण (वय 45) हे राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात त्याच्या कुटुंबासह राहत होते. गावठाण येथील विट भट्टीवर ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होते.
दि. 2 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान अनिल गायकवाड नामक इसमाने आमच्या घरी येऊन सांगीतले की, चाँद पठाण हे मच्छिंद्र पेरणे यांच्या कपाशीच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहे. तेव्हा मी माझ्याकडे असलेल्या पिकअप चारचाकी घेऊन रेल्वे स्टेशन परिसरातील मच्छिंद्र पेरणे यांच्या कपाशीच्या शेतात जाऊन पाहिले असता अनिल गायकवाड माझ्याआधी त्या ठिकाणी पोहचला होता. मी बेशुध्द अवस्थेत असलेल्या वडिलांना हलवून पाहिले असता त्यांची हालचाल होत नव्हती. तेव्हा मी माझा चुलतभाऊ यासीन पठाण यास फोन करून बोलविले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे, सहाय्यक फौजदार तुळशीराम गिते, हवालदार सुरज गायकवाड, संदीप ठाणगे, नदीम शेख, संदीप बडे, चालक उत्तरेश्वर मोराळे आदी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह रूग्णवाहिकेतून राहुरीच्या ग्रामीण रूग्णालयात नेला. तेथील वैद्यकीय आधिकार्यांनी वडिलांना तपासून उपचारापुर्वीच ते मयत झाल्याचे घोषित केले.
त्यानंतर मृतदेह नगर येथील सिव्हिल रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. मी दु:खात असल्याने घरीच थांबलो. काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आमचे नातेवाईक मृतदेह तांदुळवाडी येथे घेऊन आले व त्यांनी मला सांगीतले, वडील चाँद पठाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे नगरच्या सिव्हिलच्या वैद्यकीय अधिकार्यांनी सांगीतले.
काल दि. 3 ऑगस्ट रोजी मी तांदुळवाडी येथे असताना मला गावातील लोकांकडून समजले की, 2 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास माझे वडील चाँद पठाण हे विटभट्टीवर काम करत असताना वैष्णवी अनिल गायकवाड ही महिला वडील चाँद पठाण यांना बोलवण्यासाठी तीन वेळेस गेली. पण वडील तिच्यासोबत आले नाही. त्यानंतर वैष्णवी अनिल गायकवाड ही पुन्हा चाँद पठाण यांच्याकडे विटभट्टीवर गेली. त्यावेळी वडील तिच्यासोबत मच्छिंद्र पेरणे यांच्या शेतातील घराकडे गेले होते. त्यानंतर तीन ते चार तासांनीच वडील चाँद पठाण हे मच्छिंद्र पेरणे यांच्या कपाशीच्या शेतात मयत अवस्थेत मिळुन आले आहेत.
तसेच वैष्णवी अनिल गायकवाड हिने वडील चाँद पठाण यांनी कपाशीच्या शेतात असणारे चिक्कुच्या झाडाला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांना झाडावरुन खाली उतरविले, त्यानंतर अनिल गायकवाड व त्याचे मेव्हणा नामे बजरंग बर्डे यांना बोलावून घेवून वडील चाँद पठाण यांना कपाशीच्या शेतात सर्यामध्ये टाकून वडील चाँद पठाण हे बेशुध्द अवस्थेत पडलेले आहेत, असा भ्रम तयार केला व वडिलांचा मोबाईल फोन, चप्पल व गळफास घेतलेली साडी कोठेतरी पुरावा नष्ट करण्यासाठी टाकलेली आहे, अशी माहिती मला मिळाली आहे. याप्रकरणी शकील चाँद पठाण रा. तांदुळवाडी, ता. राहुरी याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात वैष्णवी अनिल गायकवाड ह.मु. तांदुळवाडी, ता. राहुरी. अनिल गायकवाड ह.मु. तांदुळवाडी ता. राहुरी. बजरंग बर्डे रा. पिंप्री अवघड, ता. राहुरी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस) कलम 108, 238, 3(5), 351 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.
चाँद पठाण यांचा मृतदेहाचे शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी काल सकाळी 8.30 वाजे दरम्यान पठाण यांची अंत्ययात्रा थेट राहुरी पोलीस ठाण्यात नेली. आणि सदर प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नातेवाईकांची समजुत काढून आम्हाला तपासा करीता थोडा वेळ द्या. दोषी असलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करणे, हे आमचे कर्तव्य आहे. तसेच शवविच्छेदनचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी दोषी असलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करु असे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी मयताचा राहुरी येथील कब्रस्थानात अंत्यविधी केला.