जामखेड । तालुका प्रतिनिधी
शहरातील नवीन न्यायालय व म्हाडा कॉलनीच्या परिसरातील एका शेतात वडील व मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे ज्या मॅटच्या कापडाने मुलाने गळफास घेतली त्याच मॅटच्या कपड्याने बापाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. कानिफनाथ ज्ञानदेव पवार (वय 45) व सचित कानिफनाथ पवार (वय 16, रा. आरोळे वस्ती, जामखेड) अशी गळफास घेतलेल्या बापलेकाची नावे आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेने जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड शहरातील आरोळे वस्ती येथे मयत कानिफनाथ पवार कुटुंबासह रहात होते. दोन तीन दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. याचदरम्यान शुक्रवारी (दि.2) रात्री बापलेकांत घरगुती कारणावरून वाद झाल्याची शक्यता आहे. सचित रात्री घराबाहेर निघून गेला. यानंतर कानिफनाथ यांनी रात्री मुलाचा आजूबाजूला शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.
यानंतर ते पुन्हा पहाटेच्या सुमारास मुलाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले. यावेळी सचितने नवीन न्यायालय व म्हाडा कॉलनीच्या परिसरात असलेल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पाहिले. त्यामुळे वडीलांना हा धक्का सहन झाला नसावा म्हणून त्यांनी मुलाचा मृतदेह खाली घेतला. यानंतर मुलाने ज्या मॅटच्या कापडाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याच मॅटच्या कपड्याने बापाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी त्यांची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. नगरसेवक महेश निमोणकर व नगरसेवक संतोष गव्हाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कदम व कॉन्स्टेबल सचिन देवडे हे देखील दाखल झाले. यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश उमासे यांनी दोघांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.




