बेलवंडी (वार्ताहर)
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातील नहेरमळा येथे आठ महिन्यांच्या बालकाला विहिरीत टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना २७ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, अवघ्या एक तासात या गुन्ह्याचा उलगडा करत आरोपी सोनाली योगेश दळवी हिस ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजार केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी की, सुदाम दळवी यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत कार्तिक योगेश दळवी (वय ८ महिने) पाण्यावर तरंगताना दिसल्याची माहिती दुपारी १२ वाजता पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी जाऊन बालकाला बाहेर काढले. याप्रकरणी कार्तिकचे आजोबा अशोक रामकृष्ण दळवी यांनी दिलेल्या फियादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार तपासाची चक्रे फिरवली. कार्तिकची आई, चुलती व चुलता यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. मात्र, तिघांकडून विसंगत माहिती देण्यात आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. खाकीचा धाक दाखवला असता कार्तिकची आई सोनाली योगेश दळवी हिने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
घरात कोणी नसल्याची खात्री करून, रागाच्या भरात तिने कार्तिकला झोळीतून काढून ब्लँकेटमध्ये गुंडाळले आणि शेतातील विहिरीत टाकून दिल्याचे तिने सांगितले. कार्तिकचे वडील योगेश दळवी यांनी पत्नी सोनाली ही किरकोळ कारणांवरून चिडचिड करत असल्याचे आणि मानसिक तणावात असल्याची माहिती पोलिसांना दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम पवार, पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर, रवींद्र औटी, कैलास शिपनकर, दादासाहेब क्षिरसागर, विनोद पवार, सुरेखा वलवे, अविंदा जाधव, भाऊसाहेब शिंदे यांच्या पथकाने केली. तपास बेलवंडी पोलिस करीत आहेत.




