सिन्नर | वार्ताहर Sinnar
तालुक्यातील शिवडे गावात आज (दि.4) सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतमजूरचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. बिबट्या व शेतमजूरात झटापट होऊन दोघेही कठडा नसलेल्या विहिरीत पडल्याने बिबट्याचाही मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
गावालगत असलेल्या शिवारात गवतात दडून बसलेल्या बिबट्याने अचानक लक्ष्मण मंगा आगीविले यांच्यावर हल्ला केला. त्यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याला प्रतिकार केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. मात्र, या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तात्काळ पांढुर्ली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, या घटनेनंतर अवघ्या 300 मीटर अंतरावर असलेल्या गणपत अमृता चव्हाण यांच्या गट नंबर 811 मध्ये मजुरीचे काम करणारे गोरक्ष लक्ष्मण जाधव (40) यांच्यावरही त्याच बिबट्याने हल्ला केला. बिबट्या आणि जाधव यांच्यात झटापट सुरू असताना दोघेही कठडा नसलेल्या विहिरीत कोसळले. या दुर्घटनेत गोरक्ष जाधव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून बचावकार्याचे नियोजन केले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी बेलू येथील जीवरक्षक गोविंद तुपे यांना पाचारण करण्यात आले. मात्र, विहिरीत बिबट्या असल्याने जीवरक्षकांना थेट मृतदेह बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रथम विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुमारे 3 ते 4 तास बिबट्या विहिरीत पडून होता. पाण्याबाहेर येण्यासाठी केलेल्या धडपडीत बिबट्या गंभीर जखमी झाला. अखेर पिंजऱ्याच्या साहाय्याने बिबट्याला बाहेर काढण्यात आले. मात्र, तो मृत अवस्थेत आढळून आला. यानंतर गोरक्ष जाधव यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, सिन्नर येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवडे व परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांकडून वन विभागाकडे तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. वन विभागाकडून पुढील तपास व पंचनामा प्रक्रिया करण्यात आली.




