Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारांची चौकशी होणार

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारांची चौकशी होणार

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कल्पना चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी सभापतींच्या कार्यकाळातील कामकाजाच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्यामुळे या व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चौकशीत गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सभापती आणि संचालकांनी दिली.

- Advertisement -

या बैठकीस उपसभापती विनायक माळेकर, माजी सभापती शिवाजी चुंभळे, संचालक सविता तुंगार, संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, तानाजी करंजकर, प्रल्हाद काकड , धनाजी पाटील, राजाराम धनवटे, भास्कर गावित, जगन्नाथ कटाळे, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे आणि संदीप पाटील उपस्थित होते.

YouTube video player

संचालकांच्या निरीक्षणानुसार, प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ज्या ठेकेदाराला टेंडर देण्यात आले, त्याच्या क्षमतेचा योग्य विचार झालेला नाही. तसेच, या कामासाठी दिलेल्या निधीमध्येही तफावत जाणवत आहे. बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याच्या गुणवत्तेबाबतही शंका व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून सत्य बाहेर आणले जाईल.

याशिवाय, बाजार समितीच्या आवारातील सुरक्षेच्या व्यवस्थेमध्येही अनियमितता आढळून आली आहे. कागदोपत्री ३५ सुरक्षा रक्षक दाखल असताना, प्रत्यक्षात फक्त १८ रक्षक कार्यरत असल्याचे आढळले. सुरक्षेच्या व्यवस्थेतील या तफावतीमुळे बाजार समितीच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बाजार समितीच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या खत प्रकल्पासंदर्भातही नियम डावलल्याचे आढळले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या अटीशर्ती पाळल्या गेल्या नसून, हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास व्यापाऱ्यांच्या गाळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, कचरा संकलनाची जबाबदारी समितीवर येणार होती. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्याचा विचार असून, व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

याशिवाय, बाजार समितीत अधिक सोयीसुविधा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुलभ शौचालये, उपहारगृह, निवारा शेड आणि सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट केली जाणार आहे.

यापूर्वीच्या अनेक बैठकींची कार्यवाही (प्रोसिडिंग) उपलब्ध नव्हती, मात्र या सभेत ती मिळाल्याने संचालकांनी समाधान व्यक्त केले. बाजार समितीतील विविध अनियमित व्यवहारांबाबत पुढील तपास सुरू असून, लवकरच या प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

बाजार समितीच्या पूर्वीच्या कारभारात काही वित्तीय तफावत असल्याचे आढळून आले आहे. यासंबंधी सखोल चौकशी केली जाणार असून, अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. बाजार समितीतील सुरक्षेच्या व्यवस्थेतही त्रुटी आढळल्या असून, त्यासंदर्भात योग्य सुधारणा केल्या जातील. तसेच, व्यापाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुलभ शौचालये, उपहारगृह, निवारा शेड आणि सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
कल्पना शिवाजी चुंभळे सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती,नाशिक

प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ज्या ठेकेदाराला टेंडर देण्यात आले, त्याच्या क्षमतेचा योग्य विचार झाल्याचे दिसत नाही. तसेच, या कामासाठी दिलेल्या निधीमध्ये तफावत आहे. बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याच्या गुणवत्तेबाबतही शंका आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
विनायक माळेकर, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती,नाशिक

प्रोसिडिंगसंदर्भात संचालकांचे मत
बाजार समितीच्या मागील काही बैठकींची प्रोसिडिंग उपलब्ध होत नव्हती, त्यामुळे अनेक निर्णयांबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, या सभेत ती मिळाल्याने संचालकांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात कोणत्याही निर्णयांची पारदर्शकता राहावी यासाठी सर्व प्रोसिडिंग नियमितपणे उपलब्ध करून दिली जातील.

बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता असावी, यासाठी ठोस निर्णय घेतला जाणार आहे. ज्येष्ठता आणि कार्यक्षमतेच्या आधारे योग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येईल. यामध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपात होणार नाही, याची खात्री केली जाईल.

ताज्या बातम्या

AMC Election : शिवसेनेचा गड की भाजप-राष्ट्रवादीची मुसंडी?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगरच्या मध्यवर्ती शहराचा भाग हा पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात शिवसेनेला सोबत घेऊनच यापूर्वी भाजपला काही प्रमाणात यश मिळाले होते....