पुणे । प्रतिनिधी Pune
पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत अमानुष आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत, रांजणगाव खंडाळे परिसरातील ग्रोवेल कंपनीच्या पाठीमागे एका आईसह तिच्या दोन लहान मुलांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या तिहेरी हत्याकांडाने भीतीचे वातावरण पसरले आहे. रांजणगाव पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ही धक्कादायक घटना पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत, रांजणगाव खंडाळे परिसरातील ग्रोवेल कंपनीच्या पाठीमागे घडली. सकाळी कामावर येणाऱ्या कंपनीच्या कामगारांना या ठिकाणी जळालेल्या अवस्थेत तीन मृतदेह दिसले. त्यांनी तात्काळ रांजणगाव पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तसेच रांजणगाव पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
प्राथमिक तपासानुसार, मृतांमध्ये अंदाजे २५ ते ३० वर्षांची एक महिला आणि तिचे दोन लहान मुले (एक मुलगा व एक मुलगी) यांचा समावेश आहे. लहान मुलाचे वय अंदाजे चार वर्षे आणि लहान बाळाचे वय अंदाजे दीड वर्षे असे आहे. एका स्रोतानुसार, हे मृतदेह निर्घृण हत्या करून त्यांना जाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या तिघांना अन्य ठिकाणाहून येथे आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
रांजणगाव खंडाळे हद्दीमध्ये या तिघांना आणून त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पावसामुळे ते पूर्णपणे न पेटल्याने तिघांचेही मृतदेह तसेच राहिले आणि अर्धवटजळालेल्या अवस्थेत आढळून आले. या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील हरवलेल्या व्यक्तींबाबतची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, घटनास्थळी मिळालेले पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपशील तपासण्यात येत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन पोलीस या क्रूर खूनामागील नेमकी कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करत आहेत.