अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एका ट्रक चालक तरूणाला लोखंडी कडे, दगड व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी (21 डिसेंबर) दुपारी शहरातील कल्याण रस्ता परिसरात घडली. ज्ञानेश्वर भगवान पालवे (वय 29, रा. कोल्हार कोल्हुबाई, ता. पाथर्डी) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विशाल कदम (रा. नेप्ती, ता. अहिल्यानगर) व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर पालवे हे ट्रक मालक बापुराव पालवे यांच्या 12 टायर ट्रकवर चालक म्हणून काम करतात. रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ट्रक मालकाने फोन करून ट्रक (एमएच 16 सीसी 7218) अंबिका रोडलाईन्समार्फत यशवंत पॅकिंग, कल्याण रस्ता येथून चिंच पॅकिंगचे बॉक्स भरून पनवेल येथील न्हावा-शेवा येथे पोहोच करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार फिर्यादीने ट्रक यशवंत पॅकिंग येथे लावला. तेथील गोदाम कर्मचार्यांनी माल भरून दिला. दरम्यान, दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून तीन इसम तेथे आले. त्यापैकी एकाने स्वतःचे नाव विशाल कदम असल्याचे सांगून, श्रीकांत चंगेडिया यांच्याकडील व्यवहाराचे पैसे थकित असल्याचे कारण देत गाडी खाली करण्याची धमकी दिली.
गाडी खाली केली नाही तर जाळून टाकीन, अशी धमकी देत त्याने शिवीगाळ सुरू केली. फिर्यादीने सदर वाद हा संबंधित पक्षांचा असून आपला त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितल्याने विशाल कदम याला राग आला. त्यानंतर त्याने फिर्यादीला ट्रकवरून खाली ओढून हातातील स्टीलच्या कड्याने डोक्यात मारहाण करून जखमी केले. त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनीही फिर्यादीला मारहाण केली. यावेळी विशाल कदम याने दगड उचलून ट्रकच्या समोरील काच फोडून वाहनाचे नुकसानही केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.




