मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
भरधाव वेगात जाणार्या मालट्रकने पाठीमागून दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरून जाणारे दाम्पत्य ठार झाले. मालेगाव-सटाणा रस्त्यावरील लखमापूर नजीकच्या चिंचावड फाट्याजवळ हा अपघात झाला.
तालुक्यातील कुकाणे येथील नितीन भानुदास अहिरे (38) हे आपली पत्नी कविता नितीन अहिरे (32) यांच्या सोबत एम.एच. 41 डीसी 3066 या दुचाकीने नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी जात होते. चिंचावड फाट्यावरील गतिरोधकाजवळ त्यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला असता त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात येणार्या एमएच. 12 एलटी 9944 या मालट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
या धडकेत अहिरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. नितीन अहिरे यांचा जागीच मृत्यू झाला तर कविता अहिरे यांचा मालेगावी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातस्थळी ट्रक सोडून पसार झालेल्या मालट्रक चालकाविरुद्ध सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिरे दाम्पत्याच्या या अपघाती मृत्यूने कुकाणे गावावर शोककळा पसरली आहे.