नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी २ एप्रिल रोजी अमेरिकेच्या नागरिकांना संबोधित केले. यात त्यांनी युद्धातबाबतची आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. इराणाने आमच्या अटी मान्य केल्या नाही तर अश्मयुगात पाठवणार असा गर्भित इशारा दिला आहे. इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, विशेषतः ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’त अडकलेल्या देशांना एक प्रकारे सज्जड दमच भरला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, होर्मुज खाडी खुली केल्यानंतर आपोआप तेलाच्या किमती कमी होतील. हेच नाही तर त्यांना होर्मुज खाडीची गरज नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने जगाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अनेक देश संकटात असून कच्चे तेल आणि एलपीजी गॅसची मोठी समस्या आहे. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुजच्या मुद्द्यात हातवर केल्याचे बघायला मिळतेय.
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा अन्यथा..
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये ज्या देशांची जहाजे अडकली आहेत किंवा ज्यांना इराणच्या मार्गाने तेलाचा पुरवठा हवा आहे, त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी दोनच पर्याय ठेवले आहेत. ट्रम्प म्हणाले, “ज्यांना तेल हवे आहे त्यांनी एकतर स्वतः तिथे जाऊन इराणशी दोन हात करावेत किंवा सरळ अमेरिकेकडून तेल खरेदी करावे. आम्ही आमच्या जवानांचे प्राण इतरांच्या तेलासाठी धोक्यात घालणार नाही.” हा इशारा प्रामुख्याने आशियाई आणि युरोपियन देशांसाठी असल्याचे मानले जात आहे.
इराणचा मिसाइल प्रोग्राम इतिहास जमा
ट्रम्प यांच्या संबोधनात त्यांनी दावा केला की, अमेरिकेच्या शक्तीशाली बी-२ बॉम्बर विमानांनी इराणच्या अण्वस्त्र तळांवर भीषण हल्ले केले आहेत. “इराणचा मिसाइल प्रोग्राम आता इतिहास जमा झाला आहे. जर त्यांनी अण्वस्त्र बनवण्याचा प्रयत्न केला, तर ते इस्रायल आणि अमेरिकेसाठी मृत्यूचे वॉरंट ठरेल आणि आम्ही ते कधीही होऊ देणार नाही. माजी राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या चुका मी सुधारत आहे,” असेही ट्रम्प यांनी अभिमानाने नमूद केले.
दोन ते तीन आठवड्यात कठोर भूमिका घेतली जाईल
पुढील दोन ते तीन आठवड्यांत अधिक कठोर भूमिका घेतली जाईल. इराणमधील प्रमुख टार्गेट पूर्णत्वाच्या जवळ पोहोचली आहेत. ‘आमची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी आम्ही आमची मोहीम सुरूच ठेवू. अमेरिका लवकरच आमची सर्व उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या मार्गावर आहे,’ असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले.
सर्व वीज निर्मिती केंद्रांवर एकाच वेळी मोठा हल्ला करु
इराणला शेवटचा इशारा देताना ट्रम्प म्हणाले की, “जर येत्या दोन-तीन आठवड्यांत इराणने तडजोड केली नाही, तर आम्ही त्यांच्या देशातील सर्व वीज निर्मिती केंद्रांवर एकाच वेळी मोठा हल्ला करू. इराणला अंधारात लोटण्यास आम्हाला वेळ लागणार नाही.” संघर्ष संपताच होर्मुझची सामुद्रधुनी आपोआप उघडेल, कारण इराणला पुन्हा उभे राहण्यासाठी तेल विकण्याशिवाय पर्याय नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. इराणमधील सत्तापालटाच्या संदर्भात, ट्रम्प म्हणाले की, हा हल्ला सत्तापालटाच्या उद्देशाने कधीच केला गेला नव्हता, उलट त्यांच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूमुळे सत्तापालट झाला आहे.





