Saturday, July 27, 2024
Homeनगरतुळशीराम कातोरेंना देवठाण येथे जमावाकडून मारहाण?

तुळशीराम कातोरेंना देवठाण येथे जमावाकडून मारहाण?

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील देवठाण येथे ठाकर समाजाचे नेते कॉ. तुळशीराम कातोरे यांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद अकोलेत उमटले. दोन्ही बाजूंचे समर्थक पोलीस ठाण्यात जमा झाले. तेथे माकप नेते डॉ. अजित नवले व माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. याप्रकरणी अकोले पोलिसांनी अखेर दोन्हीही बाजूचे कार्यकर्ते शांत होत नसल्याचे पाहून फिर्याद द्या, त्यानंतर आम्ही कारवाई करू असा पवित्रा घेतला. मात्र रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा कुणावरही दाखल झाला नव्हता.

- Advertisement -

आदिवासी ठाकर समाजातील युवक नेते कॉ. तुळशीराम कातोरे यांनी लोकसभा निवडणुकीतील राजूर येथे महविकास आघाडीचे उमेदवार, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ सभेत पंचायत समितीचे माजी उपसभापती व ठाकर समाजाचे युवा नेते मारुती मेंगाळ यांचेसह त्यांच्या समर्थकांवर व्यक्तिगत स्वरूपाची टीका आपल्या खास शैलीत केली होती. या सभेतील कातोरे यांचे भाषण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. तेव्हापासून आदिवासी ठाकर समाजातील दोन गटांतील वाद चव्हाट्यावर येणार असे बोलले जात असतानाच आज सकाळी महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा दिलेले मारुती मेंगाळ यांचे समर्थक कॉ. तुळशीराम कातोरे यांना जाब विचारण्यासाठी देवठाण या त्यांच्या गावी गेले होते. त्यावेळी त्यांच्यात राजूर येथील सभेत केलेल्या टीका-टिप्पणी संदर्भात चर्चा सुरू होती. यावेळी मेंगाळ समर्थक व कातोरे समर्थक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. काही काळ देवठाण येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. याचवेळी माकप नेते डॉ. अजित नवले तेथे आले व त्यानंतर वाद अधिकच चिघळला गेल्याचे मेंगाळ समर्थकांचे म्हणणे आहे.

कॉ. कातोरे यांनी आपल्यावर झालेल्या हल्ला व मारहाण संदर्भात सविस्तर माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. मारुती मेंगाळ यांच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केल्याचा आरोप तुळशीराम कातोरे यांनी केला आहे. या मारहाणीनंतर शिवसेना (उबाठा) गटाचे विधानसभा संघटक मधुकर तळपाडे यांनी या घटनेची माहिती सोशल मीडियावर टाकून सर्वांनी अकोले पोलीस ठाण्यामध्ये जमावे असा संदेश टाकल्याने पोलीस ठाण्यामध्येच दोन्ही गटाचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. यावेळी कॉ. डॉ. अजित नवले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश नवले, तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, मधुकर तळपाडे, संभाजी ब्रिगेडचे संघटक डॉ. संदीप कडलग, काँग्रेसचे मदन पथवे, माजी पंचायत समिती सदस्या सीताबाई पथवे आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आले. यावेळी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ व कॉ. डॉ.अजित नवले यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली.

तर तुळशीराम कातोरे यांच्यावर हल्ला झालेला आहे, अगोदर यासंदर्भात गुन्हे दाखल करा त्यानंतर इतर चर्चा करू, अशी आक्रमक भूमिका कॉ. डॉ. अजित नवले यांनी पोलीस निरीक्षक गुलाबराब पाटील यांचेसमोर घेतली. कातोरे यांनी राजूर येथे महाविकास आघाडीच्या सभेत आपल्याबद्दल काही अपशब्द वापरले, व्यक्तिगत आरोप केले, त्याबद्दल त्यांना जाब विचारण्यासाठी देवठाण येथे काही कार्यकर्ते गेले होते, त्यांना कोणत्याही प्रकारची मारहाण केली नाही असे मारुती मेंगाळ यांनी सांगितले व हे प्रकरण डॉ. अजित नवले यांनी वाढविले असा आरोप त्यांनी करत आम्ही त्यांचे नाव कधीही घेत नाही, त्यांनी आमच्या समाजाच्या फंद्यात पडू नये, असे मारुती मेंगाळ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या