उगाव | वार्ताहर Ugaon
उगांव परिसरातून मध्य रेल्वेच्या रुळाच्या दोन्ही बाजूला रेल्वे प्रशासनाकडून कायमस्वरूपी लोखंडी कुपंण उभारून परिसरातील शेतकर्यांना कुठलीही पुर्वसूचना न देता रस्ता बंद करण्यात केला होता. या विरोधात परिसरातील शेतकर्यांनी जनआंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने आज तहसीलदार , रेल्वे प्रशासनाने भेट देत शेतकर्यांचे म्हणणे जाणून घेतले. मात्र त्यातून तोडगा निघाला नाही.
रेल्वे फाटक नंबर १०२ लगत रेल्वे विभागाने केलेल्या कुंपणामुळे शेतकर्यांना दळणवळणासाठी येणार्या अडचणींसंदर्भात आज तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी प्रशासनाला बरोबर घेऊन स्थळ निरीक्षण केले. यावेळी रेल्वे प्रशासनाचे आहेर, मंडळ अधिकारी काळे, उगाव सरपंच अनिता पानगव्हाणे, माजी पंचायत समिती सदस्य भास्करराव पानगव्हाणे, माजी सोसायटी चेअरमन दत्तात्रय सुडके आदींसह परिसरातील शेतकरी हजर होते.
शेतकर्यांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. परिसरातील शेतकर्यांसाठी हे तारकंपाउंड चुकीचे आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी व नागरिकांना मुलभूत हक्कांपासून वंचित रहावे लागत आहे. यावर तोडगा म्हणून तहसीलदार नाईकवाडे यांनी या परिसरातून जुना नाला वाहत होता, तो बुजवला गेला आहे. तो उकरून त्या नाल्यात सिमेंट पाईप टाकून पावसाळ्यातील अतिरिक्त व पुराचे पाणी यातून वाहून जाईल व त्यावर रस्ता करण्याचा प्रस्ताव मांडला. यावर काही शेतकर्यांनी सहमती दर्शवली तर काहीनी नकार दिला. रस्ता हवा पण आपल्या शेतातून रस्त्यासाठी जागा सोडायला शेतकरी तयार नाहीत. त्यामुळे दोन तास चाललेल्या बैठकीत तोडगा न निघता प्रशासनाला परत फिरावे लागले.
केंद्र शासनाच्या रेल्वे प्रशासनाकडून त्यांच्या जागेवर रेल्वे कंपाऊंड बांधण्यात आले आहे. त्यामुळे त्याला प्रशासन, नागरिक व शासन विरोध करू शकत नाही. कारण रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे रुळावर नागरी व पाळीव जनावर जाऊन अपघात होतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हे रेल्वे कंपाउंड उभे केले आहे.
विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड
रस्ता बंद झाल्यामुळे वाहतूक बंद झाली. यात सर्वाधिक फटका वयोवृद्ध नागरिक, आजारी रुग्ण व लहान मुलांना शाळेत जाण्या-येण्यासाठी होत आहे. शेतीची कामे सुरू आहे, परंतु रस्ता नसल्यामुळे सर्व ठप्प झाले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता कसा तयार होईल व नागरिकांच्या समस्या कशा सुटतील, यासाठी तत्परता दाखविणे गरजेचे आहे.
सिताराम लक्ष्मण मापारी, बाधित शेतकरी, उगाव





