सुरगाणा । प्रतिनिधी Surgana
सुरगाणा तालुक्यात सलग तीन दिवसापासून धुव्वाधार पाऊस होत असून नदी, नाले, ओहळांना पूर आला आहे. आलेल्या पुरात एक पुरुष व एक महिला वाहुन गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पहिल्या घटनेत सराड येथील शेतकरी देवानंद हिरामण भोये (50) हे सकाळी मी शेतात जातो असे सांगून घरा बाहेर पडले. ते घरी न परतल्याने घरच्यांनी दोन दिवस शोध घेतला असता आढळून आले नाहीत. सोमवारी तीन वाजेच्या दरम्यान त्यांचा मृतदेह शेता लगतच्या तलावाच्या पाण्यावर तरंगत असतांना आढळून आल्याची माहिती पोलीस पाटील कांतीलाल भोये यांनी दिली.
पोलीस पाटील यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार मयत शेतकरी शेतात जातांना जांभळीचा ओहोळ पार करीत असतांना जोरदार पूर आल्याने पाय घसरुन पडले. पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ही तिसरी दुर्घटना घडली आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे.
दुसर्या घटनेत चिंचदा गहाले येथील मंगला बागुल (62) ही महिला सायंकाळी साडेसात वाजता शेतात डबा घेऊन जात असताना करकरीचा नाल्याला अचानक पूर आल्याने त्यात वाहून गेली. रविवारी (दि. 4) भवाडा परिसरात नार नदीत सकाळी आठ वाजता त्यांचा मृतदेह आढळला. चिंचदा गहाले येथील मंगला बागुल आपल्या शेतात जेवणाचा डबा घेऊन जात असताना करकरीचा नाल्याला आलेला पूर ओलांडत जात असताना ही घटना घडली. याबाबत बार्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या पश्चात पती, पाच मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.