Saturday, June 15, 2024
Homeनगरबापरे! एक कोटीची लाच; एमआयडीसीचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

बापरे! एक कोटीची लाच; एमआयडीसीचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

- Advertisement -

तब्बल 1 कोटी रुपयांची लाच स्वीकारताना अटक केलेला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) सहायक अभियंता अमित किशोर गायकवाड (रा. नागापूर, नगर मुळ रा. चिंचोली, राहुरी) याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश शनिवारी दिला. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी व धुळे एमआयडीसीचा कार्यकारी अभियंता गणेश वाघ हा फरारच असून त्याच्या शोधासाठी 3 पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

औरंगाबाद येथील ठेकेदाराकडून 1 कोटी रुपयांची लाच स्वीकारताना एमआयडीसीचा सहायक अभियंता गायकवाडला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगर शहराजवळील शेंडी बाह्यवळण रस्त्यावर शुक्रवारी पकडले होते. आरोपी गायकवाड याने कार्यकारी अभियंता गणेश वाघ याच्यासाठी ही रक्कम स्वीकारली होती. गणेश वाघ सध्या धुळे एमआयडीसी येथे कार्यकारी अभियंता आहे. तो पूर्वी नगरला उपअभियंता म्हणून कार्यरत होता. जलवाहिनीच्या तसेच इतर कामांची देयके अदा करण्यासाठी लाचेची मागण्यात आली होती.

गायकवाडला लाचलुचपत पथकाने ताब्यात घेतल्यानंतर लगेचच गणेश वाघचा शोध सुरू होता. त्याच्या मार्गावर पथके होती, मात्र तो 24 तासानंतरही फरार आहे. त्याच्या शोधासाठी तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. दरम्यान, तपासी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी अमित गायकवाडला शनिवारी न्यायालयापुढे हजर केले. गायकवाड याच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत, त्याची घरझडती घ्यायची आहे, गणेश वाघला अटक करायची आहे, तसेच या गुन्ह्यात अन्य कुणी आरोपी आहेत का, याचा तपास करायचा असल्याची कारणे त्यांनी न्यायालयाला दिली. त्यानुसार न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी गायकवाडला सुनावली.

गणेश वाघ व अमित गायकवाड हे दोघेही मूळचे नगर जिल्ह्यातीलच रहिवासी आहेत. गणेश वाघची पुण्यात सदनिका आहे. लाचेचा गुन्हा घडल्यानंतर आरोपींच्या घरझडतीत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आढळण्याचे प्रकार घडतात. मात्र, तब्बल 1 कोटी रुपयांची लाच स्वीकारताना अटक होण्याची घटना राज्यात प्रथमच घडल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे. अधिक तपास विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजपूत करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या