Friday, November 15, 2024
Homeनगरदोघा अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

दोघा अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

तलावात गेले होते पोहण्यासाठी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नागरदेवळे (ता. नगर) शिवारातील ब्रम्हतळे, आलमगीर येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल, गुरूवारी दुपारी घडली. अजमत जावेद शेख (वय 13 रा. आलमगीर, नागरदेवळे) व मोहम्मद साद अन्सारी (वय 16 रा. सदर बाजार, गरीब नवाज बेकरी जवळ, भिंगार) अशी मयत अल्पवयीन मुलांची नावे आहेत.

- Advertisement -

या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरूवारी दुपारच्यावेळी अजमत शेख व मोहम्मद अन्सारी हे दोघे मित्र ब्रम्हतळे, आलमगीर येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही त्यात बुडाले. दरम्यान, जवळच आर्मीच्या सैनिकांचा कॅम्प सुरू होता. त्या कॅम्पसाठी उपस्थित असलेल्या सैनिकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तातडीने तलावाजवळ धाव घेत त्या दोघांना पाण्यातून बाहेर काढले व मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तशी माहिती त्यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी पथकासह भेट दिली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार एम. टी. विधाते करत आहेत. दरम्यान, दोघा अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आलमगीर परिसरात समजल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोघांच्या मृतदेहाचे सायंकाळी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या