नाशिक | प्रतिनिधी | Nashik
वणी-दिंडोरी रस्त्यावर भरधाव जीपने कारला (Jeep Hit a Car) दिलेल्या धडकेत नाशिक शहर पोलिस दलाचे दोन अंमलदार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. ज्ञानेश्वर नामदेव रौंदळ (वय ५२) आणि रेणुका भिकाजी कदम (४६, दोघे रा. पोलिस मुख्यालय, नाशिक) अशी मृत पोलिसांची (Police) नावे असून दोघांच्या मृत्यूमुळे पोलिस आयुक्तालयात शोक व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वणी येथील सप्तश्रृंग गडावर चैत्र यात्रोत्सवानिमित्त नेमलेल्या बंदोबस्ताचे कर्तव्य बजावून नाशिक शहराकडे परत येत असताना पोलिसांच्या खासगी कारचा अपघात झाला. मयत ज्ञानेश्वर रौंदळ व रेणुका कदम हे एमएच १५ डीएम ९१८३ क्रमांकाच्या कारमधून येत होते. त्यावेळी मंगळवारी (दि. २३) मध्यरात्री एमएच १५ ई २१३२ क्रमांकाच्या जीपने विरुद्ध दिशेने येत कारला धडक दिली. या भीषण अपघातात रौंदळ व कदम जागीच ठार झाले.
वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले.
दरम्यान, वणी पोलिसांनी (Vani Police) याप्रकरणी संशयित जीप चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तर दोन्ही मृत पोलिस अंमलदार नाशिक शहर पोलिस दलातील मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. वणी येथील बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमक म्हणून त्यांना पाठविण्यात आले होते. कर्तव्यानंतर नाशिककडे परततांना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. बुधवारी दुपारी नाशिक शहरात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रौंदळ यांच्या पश्ताच पत्नी व मुलगा असून, कदम यांच्या पश्ताच पती व सात वर्षांची मुलगी असा परिवार आहे.