मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
लहान मुलांच्या भांडणाची कुरापत काढून शहरातील नया इस्लामपुरा भागात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार करत घराची नासधूस करणार्या टोळीतील वसीम अक्तर सलीम अहमद (रा. हकीमनगर) यास अटक केली आहे. विशेष पोलीस पथकाने राबविलेल्या शोध मोहिमेत दोन गावठी रिव्हॉल्वरसह ८ जिवंत काडतुसे जप्त केली असून हल्ल्यानंतर फरार झालेल्या संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे.
नया इस्लामपुरा भागात मुलांच्या मागील भांडणाची कुरापत काढून मेहताब अली शौकत अली या सराईताने आपल्या दहा ते बारा साथीदारांसमवेत लईक अहमद मोहंमद कलीम यांच्यावर रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या झाडल्या होत्या. मात्र प्रसंगावधान राखत लईक अहमद खाली बसल्याने तो बचावला होता. यावेळी रिव्हॉल्वर व तलवारी नाचवत या गुंडांच्या टोळीने एका घराची नासधूस करत परिसरात दहशत निर्माण केली होती.
या घटनेची माहिती मिळताच आयेशानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने गुंड फरार झाले होते. अप्पर पोलीस अधिक्षक तेगबीरसिंह संधू यांनी या गोळीबाराची गंभीर दखल घेत गुंडांना शोधण्याचे निर्देश विशेष पोलीस पथकास दिल्याने पोलिसांनी त्वरेने कारवाई करत मेहताब अली शौकत अली यास ताब्यात घेत चौकशीअंती दोन गावठी रिव्हॉल्वर व आठ जिवंत काडतुसे जप्त केली होती.
या टोळीत हंकीमनगर भागात राहणारा वसीम अक्तर सलीम अहमद यास पोलिसांनी अटक करीत न्यायालयात उभे केले असता त्यास दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी पुर्वीच पकडलेल्या संशयित गुंड मेहताब याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
दरम्यान, नवा इस्लामपुरा भागात दोन्ही हातात बंदूक घेत गोळीबार करत दहशत निर्माण करणारा सराईत गुंड मेहताबची तो राहत असलेल्या परिसरात व नया इस्लामपुरा भागात पोलिसांनी धिंड काढली. या कारवाईचे परिसरातील नागरीकांनी उत्स्फुर्त स्वागत केले.




