अकोले | प्रतिनिधी
तालुक्यातील वीरगाव येथे शुक्रवारी (दि. २०) भल्या सकाळीच बिबट्याने दोघांवर प्राणघातक हल्ला करून जखमी केले. तर दोघेजण हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत.
या घटनेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. याची वन विभागाने गंभीर दखल घेतली असून सकाळपासूनच अधिकारी आणि कर्मचारी तळ ठोकून आहेत.
याबाबत वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सध्या वीरगाव शिवारात मोठ्या प्रमाणात ऊस आणि मका पीक आहे. यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळत आहे. त्यातच भक्ष्याच्या शोधात बिबट्यांचा संचार असल्याने रात्री आणि दिवसाही दर्शन होत आहे.
हे हि वाचा : Ahmednagar Politics : जिल्ह्यातील अजितदादांचा एक आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर
दरम्यान, नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांची सकाळी पिकाला पाणी देणे आणि डेअरीला दूध घालण्याची लगबग सुरू असताना वीरगावमध्ये बिबट्याने हल्ला केला आहे. बछडे चुकल्याने मादीने हल्ला केला असल्याचे समजते. यामध्ये पहिल्यांदा बस्तीराम रामचंद्र गांगड यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन जखमी केले. त्यानंतर माधव पोपट देशमुख यांच्यावर हल्ला करुन जखमी केले.
यातील जखमी गांगड यांना पुढील उपचारांसाठी नाशिकला हलविले आहे तर देशमुख यांच्यावर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या दोन हल्ल्यानंतर संदीप लक्ष्मण वाकचौरे आणि सार्थक संदीप वाकचौरे हे शेतात दुचाकीवरुन जात असताना त्यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला, परंतु ते दोघेही बालंबाल बचावले.
हे हि वाचा : Kopergoan Crime : गोळीबाराने कोपरगाव हादरले! भरदिवसा झाडल्या गोळ्या, एक गंभीर…
या घटनेची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी तत्काळ वन विभागाला दिली. त्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धिंदळे, वन परिमंडळ अधिकारी पंकज देवरे यांसह अधिकारी व कर्मचारी पिंजरे घेऊन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वन्यजीव बचाव पथकालाही पाचारण केल्यानंतर बाळासाहेब कडलग यांच्या गिन्नी गवताच्या शेतात दडून बसलेल्या बछड्याला शोध मोहीम राबवून पिंजऱ्यात जेरबंद केले.
तर मादीला पकडण्यासाठी तीन ठिकाणी पिंजरे लावले असून वन विभाग तळ ठोकून आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लहान मुले, विद्यार्थी व वृद्धांची काळजी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये आणि खबरदारी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.
हे हि वाचा : Ahmednagar Crime News : पार्किंगच्या जागेवरुन वाद, महिलेला दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी…