श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
दरवर्षी घेतल्या जाणार्या शासकीय टंकलेखन (टायपिंग) परीक्षेसाठी यावर्षी श्रीरामपूर शहर व तालुक्यात केंद्र उपलब्ध न झाल्याने शहर व तालुक्यातील परीक्षार्थींना नाईलाजाने राहाता तालुक्यातील लोणी केंद्र घ्यावे लागले. लोणी येथील कन्या विद्यामंदिरामध्ये सदर उमेदवारांची परीक्षा कालपासून सुरू झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी खासगी व्यक्तींद्वारा टायपिंग इन्स्टिट्यूट चालविले जाते. सुमारे सहा महिने येथे कोर्स केल्यानंतर या उमेदवारांची शासकीय टंकलेखन परीक्षा शासनाच्या परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाते. त्यासाठी पूर्वी श्रीरामपूर शहरात भि. रा. खटोड कन्या (बालिका) विद्यालय येथे केंद्र होते. नंतर ते केंद्र इतर ठिकाणी स्थलांतरित झाले.
शहरामध्ये बोरावके कॉलेज, सीडीजे कॉलेज ऑफ कॉमर्स तसेच तालुक्यामध्ये अशोक पॉलिटेक्निक येथे टायपिंग परीक्षेची विद्यार्थ्यांची सोय होऊ शकते. मात्र काही कारणास्तव येथील संस्थांनी टायपिंग परीक्षा केंद्र स्वीकारण्यास नकार दिल्याने नाईलाजास्तव श्रीरामपूरच्या परीक्षार्थींना शेजारच्या तालुक्यात परीक्षेस जावे लागले आहे. मागील महिन्यात अशोक पॉलिटेक्निकने परीक्षा घेण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक व इतर बैठक व्यवस्था अंतिम झाल्याने त्यांना परीक्षा केंद्र मिळू शकले नाही. शहरामध्ये जे टायपिंग इन्स्टिट्यूट चालक आहेत त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शहरातच परीक्षा केंद्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
परंतू ते या शिक्षण संस्थांना सहकार्य करीत नसल्याने या संस्था देखील याबाबत उदासीन आहेत. एकीकडे श्रीरामपूर जिल्ह्याचे स्वप्न पाहत असताना साधे टायपिंगचे केंद्र जर आपण उपलब्ध करून देणार नसू तर आपल्या तालुक्याचा शैक्षणिक दर्जा काय? असा प्रश्न शिक्षणप्रेमींनी उपस्थित केला आहे.टायपिंग क्लास इन्स्टिट्यूट चालकांनी भविष्यात या संदर्भात जागरूक राहून शहर व तालुक्यातील परीक्षार्थींना आपल्या तालुक्यातच परीक्षा केंद्र उपलब्ध कसे होईल या दृष्टीने नियोजन करावे, अशी अपेक्षा परीक्षार्थी व पालकांनी व्यक्त केली आहे.