अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अकोले तालुका हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला आहे. या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी व्हावा, म्हणून जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या अध्यक्षते खालील सनियंत्रण समितीने उडदावने (ता. अकोले) गावाची निवड मधाचे गाव योजने अंतर्गत केलेली आहे. मधाचे गाव योजनेत राज्य खादी व ग्रामोदयोग मंडळ नोडल एजन्सी म्हणून कामकाज पाहणार आहे. या योजनेस अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होण्याच्यादृष्टीने व जास्तीत जास्त लाभार्थी समाविष्ट करता यावे, म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी आशिष येरेकर यांचे संकल्पनेतून जिल्हा परिषद सेस अंतर्गत या गावाला 10 लक्ष रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेत गावातील 53 लाभार्थ्यांना मध व्यवसायासाठी मध पेट्यांचे वाटप केले जाणार आहे. परंतू मध व्यवसाय करतांना त्याचे शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण घेणे अत्यंत महत्वाचे असल्याने उडदावने येथे कृषी विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती अकोले यांच्या वतीने मध व्यवसाय उत्पादनातील संधी आणि नफा या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मध उत्पादक मधुमित्र पुरस्कार प्राप्त राजू कानवडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे महत्व लक्षात घेता गावातील इच्छुक लाभार्त्यानी अत्यंत चांगला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. यावेळी गावातील तरुण मध व्यवसायीकांनी स्वयंप्रेरनेणे पुढे येऊन शंकांचे निरसन करून घेतले.
यावेळी उपस्थित माजी सरपंच बच्चू गांगड यांनी जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकारी यांचे आभार मानून योजना यशस्वीपणे राबवण्याची हमी दिली. बचत गटाच्या माध्यमातून मध व मधाचे विविध पदार्थ (उदा. बिस्कीट, लिपस्टिक, चोकलेट) आदी उद्योगामध्ये उतरून या योजनेचा फायदा घेऊ असे, प्रतिपादन सरपंच गिर्हे यांनी केले. तसेच गावातील तरूण उद्योजकांनी पुढे येऊन या योजनेचा जास्तीतजास्त फायदा घेऊन गावातील पर्यटनाला मधाची जोड देत स्वतःचा व गावाचा आर्थिक स्तर उंचावत गाव राज्यात विशेष उंचीवर नेण्यास हातभार लावावा असे आव्हान कृषी विकास अधिकारी निलेश कानवडे यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी विकास चौरे, विस्तार अधिकारी सुपे, चव्हाण, ग्रामसेवक जगताप यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.