मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि बहुप्रतीक्षित घडामोडी अखेर प्रत्यक्षात आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे. ‘मराठी माणूस’ आणि ‘मुंबई’ या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात एक नवे वळण मिळाले आहे.
बऱ्याच काळापासून ही दोन्ही भावंडे पुन्हा एकत्र येणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर एका संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी या युतीवर शिक्कामोर्तब केले. मुंबई, महाराष्ट्र आणि विशेषतः मराठी माणसाच्या हितासाठी मतदारांनी या युतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे भावनिक आवाहन दोन्ही नेत्यांनी यावेळी केले. युतीची घोषणा करताना राज ठाकरे यांनी अत्यंत आत्मविश्वास व्यक्त केला. “मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमच्याच युतीचा होणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुंबईवरील मराठी माणसाचे वर्चस्व कायम राखण्यासाठी ही युती काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ठाकरे बंधूंच्या या नव्या युतीवर भाजपकडून पहिली आणि अत्यंत तिखट प्रतिक्रिया उमटली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या युतीवर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्रात आता केवळ भावनिक आवाहनं चालणार नाहीत. मुंबईतील जनता सुजाण असून त्यांना विकास हवा आहे. केवळ देवेंद्र फडणवीस हेच विकसित महाराष्ट्र आणि विकसित मुंबईचे स्वप्न पूर्ण करू शकतात,” असे बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर टीका करताना म्हटले की, “आम्ही सर्वजण मराठीच आहोत, काय आम्ही लंडनमधून आलो आहोत का? महायुतीत सर्वच मराठी आहेत.” उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केल्याचा आरोपही त्यांनी केला. सावरकरांचा आणि मराठी अस्मितेचा अपमान करणाऱ्यांना जनता थारा देणार नाही, असेही ते म्हणाले. बावनकुळे यांनी या युतीला ‘राजकीय अस्तित्व’ टिकवण्यासाठी केलेला प्रयत्न म्हटले आहे. “उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचे विचार सोडून दिले आहेत, त्यामुळेच आज त्यांच्याकडे केवळ मोजके लोक उरले आहेत. शिंदे साहेबांकडे अनेक सक्षम लोक गेले आहेत. ज्यांनी आतापर्यंत उत्तर भारतीयांना डिवचण्याचे काम केले, ते आता सरड्यासारखे रंग बदलत आहेत,” अशा बोचऱ्या शब्दात त्यांनी युतीवर प्रहार केला.
धाराशिव आणि नाशिकच्या विजयानंतर पाकिस्तानचे झेंडे फडकवल्याचा आरोप करत, फडणवीस हे जात-धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारण करतात, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. आता मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंची ही युती मतदारांना किती आकर्षित करते आणि भाजप-शिंदे गटाची महायुती तिला कसे प्रत्युत्तर देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





