Saturday, September 21, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र! शिवसेना(ठाकरे गट)-वंचितच्या युतीची अधिकृत घोषणा

राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र! शिवसेना(ठाकरे गट)-वंचितच्या युतीची अधिकृत घोषणा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी (Balasaheb Thackeray Birth anniversary) राज्यात नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असणाऱ्या शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीचा नवा पॅटर्न आज समोर आला आहे.

शिवसेना (UBT) आणि वंचित बहुजन आघाडीची (VBA) आज युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आणि वंचितच्या वतीने युतीची घोषणा करण्यात आली आहेत. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली.

वंचित आघाडी आणि ठाकरे गट आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी मोठं आव्हान उभं राहणार आहे. याशिवाय या नव्या युतीचे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या दूरगामी परिणाम होणार आहेत.

युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज एका स्वप्नाची पूर्ती झाली आहे. महाराष्ट्रातील जनता या युतीची आतुरतेने वाट पाहत होते. प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा आणि माझे वडील या दोघांनीही समाजातील वाईट चालीरितींवर घणाघाती प्रहार केले. आतादेखील राजकारणात काही वाईट चालीरीती शिरल्या आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसरार एकत्र आले आहेत.

वंचितच्या मविआतील समावेशाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी आणि भाजपविरोधात, हुकुमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष वंचितला विरोध करतील असे वाटत नाही. लवकरच दोन्ही पक्षांची चर्चा करुन याबाबत भूमिका स्पष्ट करू. तसेच, वंचितसोबत व इतर मित्र पक्षांसोबत जागावाटप कसे होईल, याबाबत विचार करुनच वंचितसोबत युती केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि भाजपवर घणाघाती हल्ले केले. उद्धव ठाकरे म्हणाले, देशहिताच्या नावाखाली सध्या अनेक भ्रम पसरवले जात आहे. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. सध्या देशात प्रचंड वैचारिक प्रदूषण सुरू आहे. हे वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे सर्वांनाच पुन्हा मोकळा श्वास घेता येईल.

तर, यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीची युती फक्त शिवसेनेच्या ठाकरे गटाशी आहे. महाविकास आघाडीशी ही युती नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. दोन्ही शक्तींना एकत्र येण्याची गरज होती. राज्यात भांडवलशाहीचं राजकारण सुरू आहे. तर महाराष्ट्रात महत्वाचे मुद्दे मागे पडले असल्याचंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत. लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. जिंकणं राजकारण्याच्या हातात नाही पण उमेदवारी देणं त्यांच्या हातात आहे असं आंबेडकर म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत शेतातील भांडण नाहीत तर त्यांच्यासोबत मुद्याची भांडण आहेत असं म्हणतं शरद पवार यांच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राजकीय प्रयोग पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच झाला होता आणि आता शिवसेनेतल्या फुटीनंतर पुन्हा एकदा हाच प्रयोग होताना दिसत आहे. मात्र एकीकडे वंचित आणि शिवसेनेची हात मिळवणी होत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यापासून अद्याप दूर असल्याचं दिसतं आहे. कारण सध्या ही युती फक्त शिवसेनेसोबतच असून महाविकास आघाडीचं नंतर बघू, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या