मुंबई । Mumbai
गेल्या पाच-सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजल्याने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या निवडणुकीत भाजप-शिंदे सेना युतीला रोखण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई महापालिकेची लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. रविवारी मुंबईतील ऐतिहासिक शिवतीर्थावर या दोन्ही नेत्यांची संयुक्त सभा पार पडली. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आक्रमक भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना थेट आव्हान दिले. “उद्धव ठाकरेंचे विकासावरचे एक भाषण दाखवा, मी हजार रुपये देतो,” असे विधान फडणवीस यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले, “मला चोरीचा पैसा नको. पण मी तुम्हाला आव्हान देतो, नरेंद्र मोदींपासून तुमच्या लहान कार्यकर्त्यापर्यंत, अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरीही, हिंदू-मुस्लिम मुद्द्याशिवाय केलेले तुमचे एक भाषण दाखवा, आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देऊ.” भाजपकडून प्रत्येक निवडणुकीत धर्माचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मुंबईच्या अस्मितेवरून भाजपला टोला लगावताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आम्ही मुंबईवर मराठी महापौर बसवण्याचे म्हणत आहोत, पण भाजप मात्र ‘हिंदू महापौर’ होणार असे सांगत आहे. मग देवेंद्र फडणवीस स्वतःला हिंदू मानतात की नाही? त्यांनी आधी स्वतःचे प्रमाणपत्र तपासावे.” संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा उल्लेख करताना त्यांनी जनसंघावर निशाणा साधला. “मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी झालेल्या लढ्यात जनसंघ कुठेही नव्हता. तेव्हाही गुजरातचा डोळा मुंबईवर होता आणि मोरारजी देसाईंनी गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. त्या लढ्यात मराठी माणसांनी बलिदान दिले, पण भाजपचे पूर्वज मात्र सत्तेच्या पोळीसाठी लाचार होते,” अशी टीका त्यांनी केली.
मुंबईच्या सध्याच्या दुरवस्थेवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी खळबळजनक दावा केला. “दिल्ली सध्या व्हेंटिलेटरवर आहे आणि मुंबई आयसीयूमध्ये आहे. संपूर्ण मुंबई आज ९० टक्के खोदलेली असून नागरिकांना चालायलाही जागा नाही. मेट्रो आणि रस्त्यांच्या कामांमुळे प्रचंड प्रदूषण पसरले असून या प्रदूषणातही भ्रष्टाचार सुरू आहे,” असे ते म्हणाले. भाजपला मुंबई उद्योगपती अदानींच्या घशात घालायची आहे, असा आरोप करत त्यांनी सांगितले की, सध्या मुंबईतील विकासकामांसाठी लागणाऱ्या सिमेंटपैकी ७० टक्के सिमेंट हे अदानी समूहाकडून घेतले जात आहे. भाजपच्या मनात मुंबईचे नाव पुन्हा ‘बॉम्बे’ करण्याचा कट असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संदर्भ देत ठाकरेंनी फडणवीसांची कोंडी केली. “अजित पवारांविरुद्ध तुमच्याकडे पुराव्यांच्या गोण्या होत्या, त्याचे आता काय झाले? ते पुरावे जाळून टाकले की काय? जर त्यात तथ्य असेल तर त्यांना सत्तेतून बाहेर काढा आणि जर पुरावे नसतील तर जाहीरपणे माफी मागा,” अशी मागणी त्यांनी केली. संविधानावर बोलताना त्यांनी भाजप खासदाराच्या विधानाचा दाखला दिला की, ‘अबकी बार ४०० पार’चा नारा हा केवळ संविधान बदलण्यासाठीच दिला गेला होता. या सभेमुळे मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.




