मुंबई | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. सप्टेंबरमधील अतीवृष्टीनंतर त्यांनी काही गावांना भेट दिली होती. यानंतर आता या गावांमध्ये मदत पोहोचली आहे की नाही? तेथील परिस्थिती कशी आहे? यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर पुन्हा गेले आहेत. आज (बुधवारी) त्यांच्या दौऱ्याचा पहिला दिवस असून, त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी ते म्हणाले, “मी आज मत (Vote) मागायला आलेलो नसून, तुमच्या लढ्यासाठी मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर आले आहे. तुमच्यामुळे मातीत बी पेरून अंकुर फुटतं, तर तुमच्या ऐकीने या सरकारला पाझर फुटणार नाही का? तुम्ही आता शेतकरी म्हणून एक व्हा. सरकारने जाहीर केलेले पॅकेज ही शेतकऱ्याची थट्टा आहे, पीक विम्याचे किती लोकांना पैसे मिळाले. मुळात पीकविम्याची किती रक्कम मिळणं अपेक्षित होती आणि मिळाली किती हा मोठा प्रश्न आहे”, असे त्यांनी म्हटले.
तसेच पालघर, ठाणे जिल्ह्यात दोन-तीन रुपये रक्कम मिळाली, ही शेतकऱ्याची (Farmer) थट्टा सरकारने लावली आहे. मुख्यमंत्री सांगत आहे की,आता कर्जमाफी केली तर बँकेचा फायदा होईल. हे अजब लॉजिक मला काही कळलं नाही. शेतकरी कर्जमाफी आधी खरडून गेलेली माती मागतोय. मात्र मी तुमच्या सर्व शेतकऱ्यांसोबत कायम आहे. असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
ते पुढे म्हणाले,”जिल्हा परिषद निवडणुकीत (ZP Election) पंतप्रधान येतील आणि कोपराला गूळ लावून जातील. कर्जमाफीची जूनची मुदत आम्हाला मान्य नाही, तात्काळ कर्जमाफी हवी.निवडणूक काढून घेण्यासाठी जूनची मुदत दिली आहे. आताच्या आता कर्जमुक्ती करा. निवडणुकीसाठी कर्जमुक्ती केली आहे. खोटं बोलत आहेत. सरकारने जाहीर केलेले पॅकेज आम्हाला मान्य नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी झालीच पाहिजे”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
लोकांना तुम्ही हातपाय हलवायला सांगताय
दिवाळीच्या आत पैसे देणार होते, दिवाळी झाली. तुळशीचं लग्न झालं, पंचांग काढत आहेत. मुहूर्तमागे मुहूर्त काढत आहेत. पण मदतीच्या नावाने बोंबाबोंब सुरु आहे. आम्ही तुमच्यासोबत राहणार असे सांगत आहेत. पण आम्हाला जूनची मुदत मान्य नाही. कर्जमुक्ती करा. निवडणुकीसाठी कर्जमुक्ती केली असून, सरकार खोटं बोलत आहेत. अजित पवार म्हणतात जिंकायचं म्हणून कर्जमुक्ती केली. अजित पवार बेधडक बोलत आहेत की जिंकायचं म्हणून कर्जमुक्ती केली. लोकांना तुम्ही हातपाय हलवायला सांगत आहात, मग तुम्ही काय हलवत आहात? असा संतप्त सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.




