मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (दि.१० मार्च) रोजी राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प (Budget) विधानसभेत (Vidhansabha) सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, उद्योग, यासह विविध क्षेत्रावर भर देण्यात आला आहे. त्यानंतर आता या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार टिका होत असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की,”महायुती सरकारचा (Mahayuti Government) गेल्या १० वर्षातील सर्वात बोगस अर्थसंकल्प असून लाडक्या कान्ट्रॅक्टरसाठीचा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सरकारने लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेली २१०० रुपयांची रक्कम दिली नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. निवडणूक काळात वारेमाप जाहिराती केल्या होत्या. त्यामुळे सरकारचे ‘मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी, आता थापा मारायचे थांबणार नाही, असे घोषवाक्य हवे, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले की स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही.मात्र त्यांना उद्धव ठाकरे होता येणार नाही. मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले होते. वीजबिलात ३० टक्के कपात केली का? त्याचं तुम्ही काय करणार आहात? निवडणुकीपूर्वी ज्या १० घोषणा केल्या होत्या त्यातील किती घोषणा पूर्ण केल्या? अर्थसंकल्पात कंत्राटदारांसाठी ६४ हजार कोटींची कामे असून ते मुंबईत होणार आहेत. हे दोन विमानतळे जोडण्याचे काम अदानींचे असल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
तसेच “मी नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये कार्यक्रम जाहीर करून त्यावेळी शेतकऱ्यांसाठी (Farmer) कर्जमुक्ती केली होती. परंतु आजच्या अर्थसंकल्पात ते झालेले नाही. प्रत्येकाला अन्न आणि निवारा ही सत्ताधारी सरकारची घोषणा होती. जिवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील स्थिर ठेवण्यात येणार होत्या. मग त्या कोण ठेवणार? एवढं बहुमत असून देखील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहत नसतील, तर तुमच्या बहुमताला कोण विचारणार?” असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.