Monday, November 25, 2024
Homeब्रेकिंग न्यूज"…तर भाजप संघाला संपवायलाही मागेपुढे पाहणार नाही"; नड्डांच्या 'त्या' वक्तव्याचा दाखला देत...

“…तर भाजप संघाला संपवायलाही मागेपुढे पाहणार नाही”; नड्डांच्या ‘त्या’ वक्तव्याचा दाखला देत ठाकरेंची घणाघाती टीका

मुंबई | Mumbai

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदान (Voting) येत्या सोमवारी म्हणजेच (दि.२० मे) रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे संपूर्ण जनतेच्या नजरा महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आज होणाऱ्या सभांकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची मुंबईमध्ये संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा (JP Nadda) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या विधानावरून जोरदार निशाणा साधला आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “४ जूनला जुमला पर्व संपणार असून इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. आम्हाला हे नकली सेना म्हणतात ते उद्या आरएसएसलाही नकली संघ म्हणतील. मागे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले होते, देशात एकच पक्ष राहील, म्हणजे आता हे आरएसएसला सुद्धा संपवायला निघाले आहेत. नुकतीच नड्डा यांची एक मुलाखत (Interview) आली आहे. त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, भाजप आता स्वयंपूर्ण झाला असून आम्हाला आरएसएसची गरज नाही. त्यामुळे आता हे आरएसएसला देखील नष्ट करून टाकतील. पुढील वर्षी आरएसएसला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे जसे १६ वे वरीस धोक्याचे असते तसे आरएसएससाठी १०० वा वर्ष धोक्याचे ठरेल. यामुळे आता ही हुकुमशाहीची नांदी आहे असून ज्यांनी जन्म दिला त्यालाच भाजपवाले संपवायला निघाले आहेत”, अशी घणाघाती टीका ठाकरेंनी केली.

विरोधकांच्या ‘त्या’ टीकेला ठाकरेंचे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) सभांमध्ये आपल्या भाषणांची सुरुवात देशभक्त बंधू आणि भगिनी असे करत आहेत. त्यावरून भाजपकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यानंतर आज उद्धव ठाकरेंनी भाजपच्या (BJP) या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, जे देशभक्त शब्दावर आक्षेप घेतात ते हिंदू नसतील किंवा देशभक्त नसतील. देशभक्त शब्दाला आक्षेप घेणारे देशद्रोही आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

अर्धवट राम मंदिराचे काम आम्ही पूर्ण करणार

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जे लोक काल त्यांच्यासोबत व्यासपीठावर होते, त्यांनी आधी आपली दिशा ठरवावी. ते भटकत असून मला नकली संतान म्हणतात, मी त्यांना बेअकली म्हणतो. तसेच आमचे सरकार आल्यावर आम्ही राम मंदिरावर बुलडोजर चालवणार नाही. तर आम्ही भाजपने जे राममंदिराचे अर्धवट काम केले आहे ते पूर्ण करणार आहोत, असे ठाकरेंनी सांगितले.

नड्डा नेमकं काय म्हणाले होते?

वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वयंसेवक संघाबाबत नड्डा यांना “अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील आणि आताच्या काळात भाजप चालवण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका कशी बदलली आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्या प्रश्नाला उत्तर देताना नड्डा म्हणाले की, “अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजप चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती. कारण त्यावेळी आमचा पक्ष छोटा होता. पंरतु, आता आमचा पक्ष मोठा झाला आहे, आम्ही अधिक सक्षम झालो आहोत त्यामुळे आम्ही आता स्वत: पक्ष चालवू शकतो”, असे म्हटले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या