Tuesday, February 3, 2026
HomeराजकीयUddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात, थेट सूर्याजी पिसाळशी...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात, थेट सूर्याजी पिसाळशी तुलना

मुंबई । Mumbai

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विशेषतः मुंबईत आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रमुख राजकीय नेते आक्रमक भूमिकेत उतरले असून, भाषणांतून एकमेकांवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उमेदवारांना मार्गदर्शन करताना शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार शब्दांत हल्ला चढवला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई नसून, ती ऐतिहासिक संघर्षासारखी असल्याचे म्हटले. मुघलांविरोधातील लढ्याशी तुलना करत त्यांनी या निवडणुकीला महत्त्व प्राप्त करून दिले. या वेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टोला लगावत, सूर्याजी पिसाळप्रमाणे गद्दारीची ओळख शतकानुशतके लक्षात राहते, असे वक्तव्य केले. सूर्याजी पिसाळ जसा 400 वर्षांनंतरही इतिहासात गद्दार म्हणून ओळखला जातो, तशीच ओळख पुढील काळातही कायम राहील, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

YouTube video player

महानगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले, तर काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, काही ठिकाणी भाजप तसेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आहे. त्यामुळे काही प्रभागांतील लढत सुरुवातीलाच स्पष्ट झाल्याचे चित्र आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यावेळी विशेष लक्षवेधी ठरत आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ठाकरे कुटुंबातील दोन बंधू पुन्हा एकत्र आले असून, त्याचा थेट परिणाम राजकीय समीकरणांवर दिसत आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती मैदानात उतरली आहे. तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने राजकीय रंगत आणखी वाढली आहे.

उमेदवारांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी केवळ शिंदे गटावरच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही तीव्र टीका केली. मुंबई दोन गुजरात्यांच्या हातात देणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी केंद्रातील नेतृत्वावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला. समोरून मोठ्या प्रमाणात पैसा ओतला जाईल, मात्र मनाने आणि निष्ठेने काम केल्यास विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी उमेदवारांना दिला.

लढायचे, जिंकायचे आणि विजयानंतर जल्लोष करायचा, असे स्पष्ट आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. एकही जागा विरोधकांच्या हाती जाऊ देऊ नका, असा संदेश देत त्यांनी सर्व उमेदवारांनी एकजुटीने आणि ताकदीने मैदानात उतरावे, असे सांगितले. जे उमेदवार आता मैदानात आहेत, ते सर्व निवडून आले पाहिजेत, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी प्रचाराला अधिक धार दिली.

ताज्या बातम्या

Nashik Mayor Election : नाशकात महापौर, उपमहापौरपदासाठी चुरस वाढली; ठाकरेंच्या शिवसेनेसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिकेच्या महापौरपदासाठी (Mayor Post) शुक्रवार (दि.६) रोजी निवडणूक पार पडणार आहे. भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा महापौर, उपमहापौर...