मुंबई । Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. यावर सरकारची काय भूमिका आहे, हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी ठाकरेंनी केली आहे. संसदेत बाकीचे विषय बाजुला करून बांगलादेशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारावर चर्चा करावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. इस्कॉनचं मंदिर जाळण्यात आलं. त्यांच्या प्रमुखांना अटक झाली तरीही गप्प आहोत. हिंदूंवर अत्याचार होऊनही गप्प आहोत. माझी तमाम हिंदूंतर्फे पंतप्रधान मोदींना विनंती आहे की जसं आपण एका फोनवर युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशात जे काही हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याबद्दल भूमिका घ्यायला पाहिजे. तसेच, नुसतं इथे बटेंगे, कटेंगे, फटेंगे वगैरे करुन उपयोग नाही. जिथे काही नाही तिथे छाती फुगवून दाखवू नका. जिथे अत्याचार होत आहेत त्यांना धमक दाखवण्याची गरज आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, हेच प्रश्न मांडण्यासाठी आमच्या खासदारांनी गुरुवारी मोदींची भेट मागितली होती, मात्र त्यांनी ही भेट नाकारली. आम्ही खासदारांना सांगितलं होतं की, रितसर जाऊन आपण पंतप्रधानांना पत्र द्यावं. बांगलादेशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाबद्दल सरकार काय पावलं उचलतंय, याची माहिती घ्यावी. संसदेत बाकीच्या चर्चा बाजुला ठेवून बांगलादेशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारावर केंद्र सरकारची भूमिका काय आहे. ते कोणती पावलं उचलणार आहेत, याची माहिती घ्यावी. बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना भारतात आल्या, त्या इथं सुरक्षित आहेत. मात्र बांगलादेशात अडकलेले गोरगरीब हिंदू मात्र रोज अत्याचार भोगतायत, यांच्या सुरक्षेबाबत सरकार काय करतंय, हे त्यांनी सांगायला पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.