नागपूर | Nagpur
तामिळनाडूतील डीएमके पक्षाने न्यायमुर्ती जी.आर स्वामीनाथन यांच्याविरोधात मांडलेल्या महाभियोग प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी शब्दात टिका केली. कोण होतास तू-काय झालास तू? अशी विचारणा करून हिंदुत्व सोडल्याची टीका फडणवीसांनी ठाकरे यांच्यावर केली. त्यांच्या याच टीकेला उद्धव यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले.
आज हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपूरच्या विधीमंडळात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटले की, महायुतीचे सरकार केवळ निवडणुका लढविण्याच्यादृष्टीने काम करत आहे. रोज कोणत्या ना कोणत्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघडकीस येत आहे. त्यांचे व्हिडीओ, फोटो बाहेर येत आहेत. तरीही मुख्यमंत्री ढिम्म आहेत.
केवळ एका मुद्द्यावरुन महाभियोग चालविण्याला पाठिंबा दिला नाही
आम्ही केवळ एका मुद्द्यावरून न्यायमुर्तींच्या विरोधात महाभियोग चालविण्याला पाठिंबा दिलेला नाही. त्यांच्या वर्तणुकीतले इतरही काही मुद्दे आहेत. पण आम्हाला कोण होतास तू विचारणाऱ्यांनी आधी स्वत:कडे पाहावे. मी गोमांस खातो, असे स्वत: सांगणाऱ्या किरण रिजूजू यांच्या मांडीला मांडी लावून अमित शाह जेवण करतात. अमित शाह यांनी हिंदुत्व सोडले की काय? त्यांच्यात हिम्मत असेल तर किरण रिजूजू यांच्यावर कारवाई करावी, असे प्रत्युत्तर ठाकरे यांनी दिले.
एवढ्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणाखाली घेतलेस तू
मुख्यमंत्र्यांनी आता नवीन खाते बनवावे आणि त्याचे नाव पांघरून खाते ठेवावे. म्हणजे बाकीचे मंत्री पांघरून पाहून हात-पाय पसरतील. मला मुख्यमंत्र्यांची दया येते, असे सांगून उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी एक चारोळी सादर केली. ते म्हणाले, “कोण होतास तू, काय झालास तू, एवढ्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणाखाली घेतलेस तू, कोण होतास तू, काय झालास तू”.
अमित शाह खूप हिंदुत्ववादी आहेत, त्यांनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. संघांनी तर मला शिकवूच नये, वंदे मातरमची तुम्ही चर्चा करताय, असे म्हणत अमित शाहांवर निशाणा साधला. तसेच, अमित शाह तुमच्या मंत्रिमंडळात किरण रिजीजू जे मंत्री आहेत ते म्हणतात मी गोमांस खातो. ९ डिसेंबरचा हा फोटो आहे, त्यांच्यासोबत ते जेवण करत आहेत. तुम्ही हिंदुत्ववादी म्हणताय मग गोमांस खाणाऱ्या मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घेणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी अमित शाहांनी विचारला. अमित शाह यांचा मुलगा जय शाह पाकिस्तानसोबत भारताला खेळायला लावतो. आता तुम्ही सांगा? जय शाह हिंदुत्ववादी नाही म्हणून तो पाकिस्तानसोबत खेळायला लावता का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.
शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार का?
केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले राज्याकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही, नंतर घाईघाईने मदतीचा प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावात नेमकं काय आहे? हे किती मदतीसाठी प्रस्ताव दिला आहे हे विचारलं पाहिजे? पीक विम्याची सुद्धा मदत व्हायला पाहिजे होती, त्याची सुद्धा थट्टा झाली आहे. शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या कंपन्यावर सरकार काही कारवाई करणार आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरुन वाद कसा होऊ शकतो?
मागच्या आठवड्यात संसदेत वंदे मातरमवर चर्चा किंवा वाद झाला. एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरून वाद कसा काय होऊ शकतो? इतक्या वर्षांनंतर भाजपाला वंदे मातरम का आठवलं? वंदे मातरमला १५० वर्ष झाली आहेत. भाजपाचे वंदे मातरम हे फक्त वन डे मातरम आहे. कारण बाकीच्या दिवशी त्यांना त्याची काय पडलेली नसते. भारतात काय चालले आहे? याच्याशी त्यांना काही घेणे-देणे नाही. वंदे मातरम म्हणायचे आणि देशातील माता उपाशी आहे, त्याच्याकडे डोळेझाक करायची, असा हा प्रकार आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
विशिष्ट संख्येचा नियम असला नसला फरक पडत नाही
आम्ही गेल्या अधिवेशनातच विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा सांगितला आहे. भास्करराव जाधव यांचे नावही जाहीर केले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी विशिष्ट संख्येचा नियम असला किंवा नसला तरी काही फरक पडत नाही. उपमुख्यमंत्री हे घटनेत नसलेले पद दिले. आपल्याकडे तर दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत. घटनेत नसलेली दोन दोन पदांवर माणसं आहेत. मग विरोधी पक्षनेतेपदाला का घाबरता? उपमुख्यमंत्री हे पद रद्द झालं पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितलं आहे, भास्कर जाधव यांचं नावं दिलं आहे. मात्र, अद्यापही त्यावर निर्णय नाही, उत्तर मिळालेलं नाही. विरोधी पक्ष नेतेपदाला तुम्ही घाबरताय का? बिन नंबरच्या मंत्र्यांना काय किंमत आहे? उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पद नाही. त्यामुळे, मुख्यमंत्री यांना विचारलं पाहिजे की विरोधी पक्ष नेते पद का दिलं जात नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





