मुंबई । Mumbai
आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सामन्याला विरोध करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. पहलगाम हल्ल्यातील भारतीयांचे रक्त अजूनही ताजे असताना हा सामना का खेळला जातोय, असा संतप्त सवाल करत त्यांनी देशभक्तीच्या नावाखाली भाजप व्यापार करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
याच पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने ‘हर घर से सिंदूर’ आंदोलन पुकारले आहे. ते म्हणाले की, “पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांना वाटले होते की आता पाकिस्तानचे तुकडे केले जातील. ऑपरेशन सिंदूरनंतरही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवू नयेत, असे ठाम धोरण सरकारने स्पष्ट केले पाहिजे.”
नीरज चोप्रा प्रकरणाचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जेव्हा नीरज चोप्राने पाकिस्तानी प्रशिक्षक आणि खेळाडूंना भारतात आमंत्रित केले, तेव्हा त्याला ‘अंधभक्तांनी’ देशद्रोही ठरवले होते. आता बीसीसीआय पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळत आहे. मग आता नेमके काय बदलले आहे? यांना देशापेक्षा व्यापार अधिक महत्त्वाचा वाटतो,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली.
ते म्हणाले की, भाजप देशभक्तीचा व्यापार करत आहे. हा देशभक्तीचा अपमान आहे. मला राजनाथ सिंह आणि अमित शहा यांना विचारायचे आहे की तुम्ही हे युद्ध संपले आहे असे जाहीर करणार आहात का? ते पुढे म्हणाले, “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. केवळ एका खेळावर बहिष्कार टाकला तर देशावर कोणतेही मोठे संकट येणार नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही, तोपर्यंत आपण त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवणार नाही, हे ठणकावून सांगितले पाहिजे.”
जावेद मियादाद यांच्या ‘मातोश्री’ भेटीवरून भाजपने केलेल्या टीकेलाही उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “मातोश्रीवर जावेद मियादाद आल्यावरून भाजप टीका करत असेल, तर मला विचारायचे आहे की त्यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायची आहे का? भाजपची ती लायकी आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची आठवण काढली. तसेच, ‘आज जर सरदार पटेल पंतप्रधान असते, तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता आणि त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा प्रश्नही निर्माण झाला नसता,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. “आज मी एका उद्विग्न मनाने आणि विषन्न भावनेतून तुमच्याशी बोलत आहे. उद्या अबूधाबीमध्ये भारत-पाक क्रिकेट सामना आहे. अजूनही पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या भारतीयांचे रक्त सुकलेले नाही आणि त्यांच्या जखमा भरलेल्या नाहीत.” असे सांगत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.




