मुंबई । Mumbai
महायुती सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आज राज्यभर आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनादरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरकारकडे इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांकडे प्रचंड बहुमत आहे, दिल्लीत त्यांचे नेते सत्तेत आहेत, तरीही भ्रष्ट मंत्र्यांना हटवण्याची त्यांची हिंमत होत नाही. स्वतः भ्रष्टाचार न करता तुम्ही इतरांच्या भ्रष्टाचाराला का पाठिशी देत आहात? जगातील सर्वात मोठ्या पक्षाला स्वच्छ मंत्रिमंडळासाठी योग्य व्यक्ती मिळत नाहीत का?” त्यांनी फडणवीसांना थेट आव्हान देत विचारले, “हा भ्रष्टाचार तुम्हाला मान्य आहे की नाही, हे स्पष्ट सांगा. जर सहन होत नसेल, तर वरून येणारा दबाव झुगारून टाका.
“महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दाखवली आहे, असे सांगत ठाकरे यांनी जनतेला जुलूमशाहीविरोधात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. त्यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवताना म्हटले, “या सरकारने महाराष्ट्राला भ्रष्टाचाराच्या खाईत लोटले आहे. आमच्या काळात मंत्र्यांवर आरोप झाले तेव्हा त्यांचे राजीनामे घेतले. मी मुख्यमंत्री असताना एका वनमंत्र्याला वाईट वागणुकीमुळे तात्काळ वनवासात पाठवले. पण आताचे सरकार जनतेच्या हितापेक्षा पैशाच्या मागे धावत आहे.
“ठाकरे यांनी राज्य गृहमंत्र्यांवरही गंभीर आरोप केले. “आमचे सहकारी संजय परब यांनी पुराव्यासह सिद्ध केले की, गृहमंत्री बार चालवत आहेत. दुसऱ्या एका मंत्र्याला ‘रम्मी खेळण्याचे’ आवडते खाते मिळाले आहे. सभागृहात शेतकऱ्यांची थट्टा करताना रम्मी खेळणाऱ्या मंत्र्यांना फडणवीस काय समज देतात? रम्मीऐवजी तीन पत्ती खेळा, अशी समज का?” असा टोला त्यांनी लगावला.
याशिवाय, ठाकरे यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. “भ्रष्टाचाराचे पुरावे दिले तरी कारवाई होत नाही. मग धनखड यांना का समज दिली नाही? त्यांना का सोडले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फडणवीसांनी भाजपच्या स्वच्छ राजकारणाच्या परंपरेला छेद दिल्याची टीकाही त्यांनी केली.शिवसेना ठाकरे गटाने या आंदोलनातून सरकारला इशारा दिला आहे की, भ्रष्टाचाराविरोधात जनतेचा आवाज दडपला जाणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा सुरू राहील, असे ठाकरे यांनी सांगितले.




