Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: "त्या धोंड्याने ते बेकायदेशीर केलेय,धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत…"; उध्दव...

Uddhav Thackeray: “त्या धोंड्याने ते बेकायदेशीर केलेय,धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत…”; उध्दव ठाकरेंची निवडणुक आयोगावर सडकून टीका

मुंबई | Mumbai
शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक घडामोडींवर भाष्य केले आहे. ‘ठाकरे ब्रॅण्ड’ खतम करण्यासाठी बाहेर काही बॅण्ड वाजत आहेत. त्या बॅण्डवाल्यांचा बॅण्ड महाराष्ट्राची जनता वाजवेल, असे जोरदार भाष्य उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच निवडणूक आयोग आमचे निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो किंवा गोठवू शकतो, पण ‘शिवसेना’ हे नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाहीत. त्या धोंड्याने ते बेकायदेशीर केलेय. ‘शिवसेना’ हे नाव दुसऱ्याला देता येत नाही. ते त्याच्या अधिकाराच्या बाहेरचे आहे, पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसल्याने सध्या चालून जातेय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केली.

मी स्वतः शून्य आहे
“उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे याला अर्थ आहे. मी स्वत: शून्य आहे. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद, पुण्याई विसरु नको असे बाळासाहेब नेहमी सांगायचे. ठाकरे संघर्ष करत आहेत, पण आमचे नाव कोणी चोरु शकत नाही. चिन्ह वैगेरे चोरले तरी आमच्यावरील प्रेम, विश्वास कसे चोरणार? तो खोक्यातून विकला जात नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

चोर तो चोरच, लोक कोणत्याही धोंड्याचे ऐकणार नाही
“लोक कोणत्याही धोंड्याचे ऐकणार नाहीत. शेवटी चोरीचा माल आहे. चोरून मतं मिळवलीत आणि त्यावर मर्दुमकी गाजवत असलात तरी चोर तो चोरच,” अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जहरी टीका केली.

YouTube video player

शिवसेना नाव दुसऱ्यांना देऊ शकत नाही
“एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही चोराचोरी केली तरी कदाचित शिवसेनेचे निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल किंवा गोठवू शकेल. खरे तर ते गोठवायला पाहिजे, असा वाद असेल तर. पण शिवसेना नाव ते दुसऱ्यांना देऊ शकत नाही. तो अधिकारच निवडणूक आयोगाला नाही. कारण शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी दिलेले आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर अधिकार आहे का? पण माझे नाव बदलल्यावर मी त्याला धोंड्याच म्हणणार. त्या धोंड्याला पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार नाही, जर लोकशाहीत आम्ही काही वेडे-वाकडे वागलो असू तर चिन्ह तुम्ही काढून घेऊ शकता, पण संविधानानुसार आम्ही काही चूक केली नसेल तर ते आमचे चिन्ह काढू शकत नाहीत.

धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत
मतांची टक्केवारी वगैरे फक्त चिन्हापुरते आहे, पण नाव नाही देऊ शकत. धोंड्याने ते बेकायदेशीर केलेय. धोंड्याला शिवसेना नाव दुसऱ्याला देताच येत नाही. ते त्याच्या अधिकाराबाहेरचे आहे. पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत म्हणून चालतेय,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या